mandar.moroney @timesgroup.com
अत्यंत कठीण भूप्रदेश असलेल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पात गेल्या काही दिवसांमध्ये वाघांचे दर्शन सुलभ झाले असून, या प्रकल्पातील वाघांची संख्या वाढून ६५ पर्यंत गेल्याचा दावा वनविभागातील अधिकारी करीत आहेत.
ताडोबा-अंधारी किंवा पेंच व्याघ्रप्रकल्पांमध्ये वाघाचे सहज दर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओघ या दोन प्रकल्पांकडे जास्त असतो. त्या तुलनेत मेळघाटात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. उंच-सखल प्रदेशामुळे येथील वाघाचे दर्शन सहजासहजी होत नाही. त्यामुळे, पर्यटकांची पावले मेळघाटकडे वळत नाहीत. पर्यटक नसल्याने पर्यटनासाठी आवश्यक त्या सुविधादेखील मेळघाटात नाहीत. या पार्श्वभूमीवर वाघाच्या दर्शनाबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला दावा पर्यटकांना सुखावणारा ठरण्याची शक्यता आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील अकोट, धारगड, यासारख्या भागात वाघांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या भागातील सुमारे १४ गावे यशस्वीपणे कोअर भागाच्या बाहेर स्थलांतरित करण्यात आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून चांगले अधिवास येथे निर्माण झाले आहेत. यामुळे, या भागात वाघांची संख्या वाढली आहे. शिकारीसाठी कुख्यात झालेल्या मेळघाटातील ढाकणा रेंजमध्येदेखील वाघांचे दर्शन वनकर्मचाऱ्यांना होऊ लागले आहे, असे वन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॅमेरा ट्रॅपमध्येदेखील वाघांची छायाचित्रे टिपण्यात आली आहे. मेळघाटातील वाघ हे इतर ठिकाणांप्रमाणे अद्याप माणसांना सरावलेले नाही. त्यामुळे, वनकर्मचाऱ्यांना ते दिसणे, हे संख्या वाढल्याचे निदर्शक असल्याचे सांगितले जाते आहे.
वाघांची संख्या ६५ अशी सांगितली जात असली तरी यापैकी २५ च्या आसपास वाघाचे बछडे आहेत. मागील वर्षी या भागात पाण्याची परिस्थिती पोषक होती. यंदा जंगलातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता, पुढील वर्षीदेखील हीच संख्या कायम राहील, हे सध्या ठामपणे सांगता येणार नसल्याचे वनविभागातील सूत्रांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट