'यंदा राज्यावर गंभीर पाणी संकट ओढवले आहे. हे संकट अस्मानी असले तरीसुद्धा मानवाचीही चूक आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची नासाडी करीत आलो आहोत. कुरआन आणि हदीसचे पालन केले असते, तर ही परिस्थिती आली नसती. कुरआनमध्ये पाण्याच्या नासाडीवर प्रचंड टीका करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर अथवा पाण्याची नासाडी म्हणजे एका दृष्टिकोनातून कुरआन आणि हदीसची अवहेलना आहे,' असे मत इंजिनीअर रईस पटेल यांनी व्यक्त केले.
जलसंचयाबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, याकरिता जमाते इस्लामी हिंदतर्फे अलीकडेच विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जाफरनगर परिसरातील मर्कजे इस्लामी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पटेल बोलत होते. ख्वाजा इजहार अहमद यांचीही यावेळी उपस्थिती होती.
'तुम्ही नदीच्या काठीही राहत असाल तरीसुद्धा तुम्ही पाण्याचा गैरवापर टाळलाच पाहिजे, पाणी हे जीवन असून त्याची नासाडी कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये,' अशी शिकवण इस्लाम धर्मात देण्यात आली आहे. ही शिकवण आपण विसरलो. त्यामुळे आज आपल्याला मराठवाड्यात गंभीर जलसंकटाला तोंड द्यावे लागत आहे. आपण कुरआनची शिकवण पाळल्यास आपल्याला या संकटावर सहज मात करता येईल, अशी माहिती यावेळी मार्गदर्शकांनी दिली. यावेळी राज्यातील पाण्याच्या साठ्यांच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली. पाण्याची बचत करण्याकरिता दुबई आणि इतर आखाती देशात कोणत्या उपाययोजना राबविल्या जातात, याचीही माहिती यावेळी पेपर प्रेझेन्टेशनद्वारे देण्यात आली. यावेळी जमातचे जिल्हाध्यक्ष डॉ. आसीफुज्जमा खान, पूर्व नागपूर अध्यक्ष डॉ. नासीर इकबाल, पश्चिम नागपूर अध्यक्ष मोहम्मद उमर खान आदी मान्यवर उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट