अमरावतीच्या श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘१४ एप्रिलची रात्र’ या एकांकिकेने यंदाचा पुरुषोत्तम करंडक पटकावला असून सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे पारितोषिक कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय नागपूरच्या ‘सृजन ००१’ने प्राप्त केले.
दोन दिवस सुरू असलेल्या महाराष्ट्र कलोपासक पुणेच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत नागपूर, अमरावती व चंद्रपूरच्या विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी एकांकिकांचे उत्कृष्ट सादरीकरण स्पर्धेत रंगत आणली. लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेत यावर्षी एकूण १७ कॉलेजेसनी भाग घेतला होता. गुरुवारी पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपमहानिरीक्षक (कारागृह) योगेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. तर संजय रहाटे, प्रभा देऊस्कर व दिलीप मुळे हे परीक्षक, महाराष्ट्रीय कलोपासकचे काका निगोजेकर व योगेश जाधव व संयोजक संजय पेंडसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘जीवनातील नाट्य तुम्ही विद्यार्थी मंचावर साकारता, पण जेलमध्ये वेगळेच नाट्य चाललेले असते. प्रत्येक कैदी, त्याची मनोभूमिका आम्हाला जवळून बघायला मिळते. त्या प्रत्येकाचे आयुष्य नाट्यमय असते. त्यातून तुम्हाला नाटकासाठी अनेक विषय मिळू शकतात’, असे योगेश देसाई म्हणाले. त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील पुरुषोत्तम करंडकच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पेंडसे, तर सूत्रसंचालन शंकर उणेजा यांनी केले.
पारितोषिके
सांघिक प्रथम : १४ एप्रिलची रात्र, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती
सांघिक द्वितीय : दर्द पोरो, एलएडी कॉलेज नागपूर
सांघिक तृतीय : अनोळखी ओळख, सीपी अॅण्ड बेरार, नागपूर
प्रायोगिक एकांकिका : सृजन ००१, कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय नागपूर
सर्वोत्कृष्ट अभिनय : वैभव ओगळे
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : गौरव श्रीरंग
सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय : अश्विनी गोरले
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : गणेश वानखेडे
अभिनय नैपुण्य (अभिनेता) : सौरभ हिरकणे
अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : केतकी कुळकर्णी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट