प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिला पोलिसावर अत्याचार करून तिची १९ लाखांनी फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून हिरालाल दिनकर पिलोंद्रे (३७) याला अटक केली आहे. त्याची दोन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
२०१०मध्ये पीडित तरुणी पोलिस भरतीसाठी नागपुरात आली. तिच्या चुलत बहिणीने पिलोंद्रे याच्यासोबत ओळख करून दिली. पिलोंद्रे याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये तिच्यावर अत्याचार केला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान, तरुणी पोलिस दलात दाखल झाली. २०१२ मध्ये त्याने तरुणीशी लग्न केले. प्रत्यक्षात त्याचे लग्न झाले होते. त्याला दोन मुलेही आहेत. लग्नानंतर फ्लॅटखरेदीसाठी पिलोंद्रे याने बँकेत संयुक्त खाते उघडले. पीडित तरुणीच्या नावे बँकेतून १९ लाखांचे कर्जही घेतले. याशिवाय तो खात्यातून पैसेही काढत होता. दरम्यान, त्याचे लग्न झाल्याची माहिती तिला मिळाली. तिने पिलोंद्रे याला याबाबत विचारणा केली. त्याने तिला मारहाण केली. त्याने पहिल्या पत्नी व मुलांना तिच्या घरी आणले. त्यानंतरही ती त्याच्यासोबत राहायला तयार होती. मात्र त्याने तिचा छळ सुरूच ठेवला. छळ असह्य झाल्याने तिने गिट्टीखदान पोलिसांत तकार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. डी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पिलोंद्रे याला अटक केली. त्याची दोन दिवस पोलिस कोठडी घेतली.
बहिणीला अडकविले जाळ्यात
पत्नी व मुलांना घरी आणल्यानंतरही पीडित तरुणी त्याच्यासोबत संसार करीत होती. ज्या चुलत बहिणीने ओळख करून दिली तिच्यावरही पिलोंद्रे याने अत्याचार केल्याचे पीडित तरुणीला कळले. याचप्रकारे अनेक तरुणींवरही त्याने अत्याचार केल्याची माहिती आहे.
भावाविरुद्धही दाखल अत्याचाराचा गुन्हा
पिलोंद्रे याचा भाऊ रवींद्र याच्याविरुद्धही गुन्हा दाखल आहे. एका महिला पोलिस उनिरीक्षकाची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचा हा गुन्हा आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी धंतोली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पिलोंद्रे हा स्पर्धा परीक्षेचे अभ्यासवर्ग चालवितो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट