पाचशे व एक हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतरही २४ नोव्हेंबरपर्यंत महावितरण व इतर सरकारी यंत्रणांनी त्या स्वीकारत ग्राहकांना दिलासा दिला. मात्र, यानंतर आता केवळ पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना १५ डिसेंबरपर्यंत जुन्या ५०० च्या नोटांनी वीजबिल भरता येणार आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानंतर महावितरणने ग्राहकांकडून जुन्या नोटा स्वीकारणे सुरूच ठेवले. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. याच काळात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बिलही भरली होती. नागपूर सर्कलमध्ये या काळात ३४ कोटी रुपयांची वीजबिल भरण्यात आली. यात काही प्रमाणात थकीत वीजबिलाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान २४ नोव्हेंबरनंतर एक हजाराच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावरच झाला असल्याने आता वीजबिलांकरता या नोटा स्वीकारण्यात येणार नसल्याची माहिती आहे. तसेच ग्राहकांनी आगाऊ वीजबिलाच्या रकमेअंतर्गत जुन्या नोटा भरू नये, यासाठी जितके बिल आहे तितकेच स्वीकारण्यात येणार आहे. मात्र, वीजबिलापोटी आगाऊ स्वरुपात (अॅडव्हान्स पेमेंट) रक्कम स्वीकारण्यात येणार नाही. याशिवाय वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in व मोबाइल अॅपची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट