शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) वीज खरेदीसाठी दरमहा ८० लाख रुपयांचे बिल भरते. विजेच्या बिलामळे मेडिकलची आर्थिक कंबरडे मोडून जाते. यामुळेच मेडिकल परिसरात सौरऊर्जेतून ‘सनब्लेस’ सोलर पार्कची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला. येथील टीबी वॉर्ड परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येईल. हा प्रकल्प उभारण्यासाठी घेतलेले कर्ज अवघ्या दहा वर्षांत अदा केल्यानंतर पुढील २० वर्षे मेडिकलला मोफत वीज मिळणे शक्य होणार आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उभारला जाणारा हा पहिला सोलर पार्क असणार आहे. अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या वतीने टीबी परिसरात जमिनीखाली सोलर पार्कचा प्लान्ट असेल. एकूण प्रकल्पाची किंमत ४९ कोटी आहे. इंडियन रिन्युएबल बँकेतर्फे सत्तर टक्के कर्ज घेण्यात येईल. यातील ३-टक्के वाटा राज्यशासनाचा असणार आहे. सात मेगावॅट क्षमतेचा सौरप्रकल्प असणार आहे.
या पार्कमध्येप सुनियोजित रस्ता, तारांचे कुंपण, पाणीपुरवठा, सामायिक पायाभूत सुविधा सहाय्य आणि मनुष्यबळ आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येतील. पहिल्या टप्प्यात ९ कोटीचा प्रकल्प उभारण्यात येईल. यातील ६ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च केंद्र शासनाकडून केला जाणार आहे. उर्वरित २ कोटी १० लाखांचा खर्च राज्य शासन करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय संशोधन व शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. मेघा गाडगीळ आणि वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे सादर केला करण्यात आला होता. सौर उर्जा प्रकल्प आकाराला आल्यानंतर दरमहा ४० लाख रुपयाची बचत होईल. यात १ कोटी १५ लाख ५० हजार युनिटची बचत होणार आहे. यामुळे दहा वर्षे कर्ज फेडल्यानंतर पुढील २० वर्षे वीज मोफत मिळण्यास मदत होणार आहे. कन्यका नॉन कन्व्हेंशनल एनर्जी प्रा. लि.च्यावतीने हा प्रकल्प उभारला जात आहे.मेडिकलच्या तिजोरीतून दहमहा ८० लाखांचे बिल वीज कंपनीला अदा करावे लागते. सोलर पार्क उभारल्यानंतर या समस्यांपासून सुटका मिळेल तसेच शासनाच्या सौर ऊर्जाप्रकल्पाला गती मिळेल. विशेष असे की, विजेची लक्षणीय बचत करून देण्यात मेडिकलचा हातभार लागेल. भविष्यात हा सोलर पार्क म्हणजे मेडिकलचे सुयोग्य उपयोजन ठरणार आहे, असे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट