आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हृदयरोगींसाठी मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीचा हृदयरोग विभाग वरदान ठरत आहे. या ठिकाणी रोज किमान चार जणांची अॅन्जिओप्लास्टी होते. रुग्णांची गरज लक्षात घेता सुपरला आणखी एक कॅथलॅब मिळवून देण्यासाठी सरकारला साकडे घालू, अशी हमी आमदार डॉ. मिलिंद माने यांनी येथे दिली.
डॉ. माने यांनी गुरुवारी सुपरला भेट दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या भेटीत कॅथलॅबची पाहणी देखील केली. सुपरमध्ये साधारणपणे १९९७ पासून ह्दयरोग विभागात कॅथलॅब कार्यान्वित झाले. भविष्यात मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वाढणारी रुग्णांची गर्दी लक्षात घेता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल, सुपर, मेयोचा विकास करण्याचे निश्चित केले आहे. गरिबांना मिळणारी आरोग्य सेवा याच रुग्णालयातून मिळत असल्यामुळे येथील सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. सामान्य माणसाप्रमाणेच आगामी काळात लोकप्रतिनिधी या रुग्णालयात उपचारासाठी येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ह्दयरोग विभागप्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे यांच्याशी दुसऱ्या कॅथलॅबसंदर्भात चर्चा केली. यावेळी सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागप्रमुख डॉ. डॉ. सुधीर गुप्ता उपस्थित होते. तासभर डॉ. माने यांनी सुपरमध्ये विविध विभागात निरीक्षण करीत अधिकाऱ्यांशी विकासावर चर्चादेखील केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट