नागपूर : बालभारतीला पुस्तक छपाईसाठी रिसायकल केलेला पेपर वापरण्याचा आदेश देण्यात यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली.
बालभारतीने व्हर्जिन पल्प पेपर पुरवठा करण्यासाठी निविदा प्रकाशित केली आहे. सदर निविदेलाच आव्हान देणारी याचिका प्रा. अरविंद सोवनी यांनी हायकोर्टात सादर केली. त्यावर सुनावणी करताना न्या. भूषण गवई आणि न्या. विनय देशपांडे यांनी बालभारतीला नोटीस बजावली, तसेच निविदेवर कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, असा आदेश दिला.
याचिकाकर्त्यानुसार, व्हर्जिन पल्प पेपर तयार करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर झाडांच्या लाकडांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासोबतच कागद तयार करण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जित होंत असतो. त्यामुळेही पर्यावरणावर परिणाम होणार आहे. जगभरात रिसायकल केलेला पेपर वापरण्यात येत आहे. देशातील इतर शैक्षणिक साहित्य छपाई करणाऱ्या मंडळांनीही रिसायकल केलेला पेपरच मागविला आहे,. त्यामुळे व्हर्जिन पल्प पेपर वापरण्यास बालभारतीला मनाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट