टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, शिट्या... अगदी सुरुवातीलाच वन्स मोअरची उत्स्फूर्त दाद... अस्सल मराठमोळ्या आणि हिंदी अजरामर गीतांचा सप्तसुरी नजराणा आणि सोबतीला गुलाबी थंडी... मग काय, दर्दी रसिक नागपूरकर शनिवारी सूरमयी संगीत मैफलीत मंत्रमुग्ध झाले. चलनी नोटांमुळे आलेला ताण, शीण जरासा सैल करीत रसिकांनी ही संगीत मैफल नुसतीच तुफान गाजविली नाही तर क्षण न क्षण एन्जॉय केला.
निमित्त होते ‘मटा कल्चर क्लब’तर्फे आयोजित पहिल्याच जाहीर सप्तसुरी संगीत सोहळ्याचे. कल्चर क्लबचे सभासद झालेल्या कलाप्रेमी नागपूरकर रसिकांसाठी खास राहुल सक्सेना लाइव्ह कन्सर्ट हा सूरमयी नजराणा पेश करण्यात आला. शंकरनगर चौकातील साई सभागृहात सादर झालेल्या या गुलाबी मैफलीत गायक कलावंतांनी एकाहून एक सरस हिंदी, मराठी चित्रपट गीते सादर करीत नागपूरकरांना सूरमयी सफर घडवून आणली.
कलावंतांना दाद देताना नागपूरकर रसिक चोखंदळपणा बाळगतात, असे म्हटले जाते. ‘मटा’च्या सप्तसुरी मैफलीने हा प्रघात खोडून काढत प्रत्येक गाण्याला टाळ्यांनी दाद देत नागपूरकरांची दिलदारीही दाखवून दिली. सारेगमप या कार्यक्रमातून राहुल सक्सेना यांनी आपल्या सूरमयी गळ्याने देशातल्या रसिकांच्या काळजात घर केले आहे. पहाडी आवाजातील त्यांच्या सादरीकरणाची खास शैली आहे. त्यांना गाताना थेट पाहण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध व्हावी यासाठी ‘मटा कल्चर क्लब’तर्फे हा दुग्धशर्करा योग जुळवून आणण्यात आला.
‘तू कहाँ ये बता...’ या रफीच्या अंदाजात सूर छेडत मैफलीला सुरवात झाली. पहिल्याच टप्प्यात कैलास खेर यांच्या खड्या आवाजी स्टाइल अंदाजात ‘तेरी दिवानी...’ असा राग छेडत राहुल सक्सेना यांनी मैफलीचा ताबा घेतला आणि एका आगळ्यावेगळ्या संगीत सोहळ्याची जाणीव रसिकांना झाली. त्यापाठोपाठ त्यांनी सादर केलेले ‘मितवा...’ हे फ्युजन अंदाजातील गीत वन्समोअरची दाद मिळवून गेले. अजय-अतुल या मराठमोळ्या जोडीने हिंदी-मराठी चित्रपट संगीतात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्याच अंदाजात ‘नटरंग’मधील ‘खेळ मांडला’ आणि शंकर महादेवन यांनी अजरामर केलेल्या ‘मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे’ या गीतांची तार छेडत त्यांनी मैफलीत आणखी रंग भरले. या गीतांनाही पुन्हा एकदा वन्स मोअरची दाद मिळविली आणि रसिकांनीदेखील त्यांना टाळ्यांचा रिदम जोडत तितक्याच जल्लोषात साथसंगत केली.
राहुल सक्सेना यांच्या सोबतीला योगेंद्र रानडे यांनी ‘एहसान होगा तेरा मुझ पर’, ‘बार बार देखो, निगाहें मिलाने को जी चाहता है...’ अशा गीतांचे सूर छेडत तितक्याच तन्मयतेने साथ दिली. श्रेया खराबे यांनी ‘मोरनी बागा मा बोले...’, ‘निगाहें मिलाने को जी चाहता है...’, ‘परदे में रहने दो...’ या अजरामर गीतांचा नजराणा पेश केला. इशा रानडे यांनी ‘दिल चीज क्या है...’, ‘आओ हुजूर तुम को...’ अशा रोमॅँटिक अंदाजात वातावरण आणखी गुलाबी केले. ‘ओ कबिरा’ आणि ‘सायबो’ अशा सुफीयाना अंदाजातून पुन्हा एकदा राहुल सक्सेना यांनी मैफलीत आणखी उत्साह पेरला. गायक कलावंतांना की बोर्डवर राजा राठोड, परिमल जोशी यांनी, बेस गिटारवर प्रांजल गझुला, लिड गिटारवर गौरव टांकसाळे, ऑक्टोपॅडवर नंदू गोहणे, तबल्यावर प्रशांत नागमोते तर ढोलकीवर पंकज यादव यांनी साथसंगत केली.
वाचक झाले सेलिब्रिटी
‘मटा’च्या आजवरच्या वाटचालीत वाचकांचे योगदान सर्वात मोठे आहे. ‘मटा’ने याची पावलोपावली जाणीव ठेवून वाचकांच्या उत्स्फूर्त पाठबळाची कृतज्ञता व्यक्त केली आहे. या कार्यक्रमातही प्रस्थापित सेलिब्रिटींना फाटा देऊन वाचकांनाच सेलिब्रिटी होण्याची अनोखी संधी दिली. ‘मटा कल्चर क्लब’चे प्रतीक असलेल्या बॅनरचे वाचकांच्या हस्ते प्रकाशन करून हा अनोखा पायंडा पाडण्यात आला. ‘मटा’चे संपादक श्रीपाद अपराजित यांनी यामागची भूमिका विषद करताना येणाऱ्या काळात हे ऋणानुबंध असेच कायम राहतील, असा आशावाद व्यक्त केला.
एक चतुर नार...
किशोर कुमार आणि आर डी बर्मन हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले सोनेरी स्वप्न. शेकडो गीते या जोडीने रूपेरी पडद्यावर अजरामर केली. ‘पडोसन’ चित्रपटातील ‘एक चतुर नार’ हे गीतदेखील त्यापैकीच एक. त्याच अंदाजात हा सूर छेडत सागर मधुमटके आणि सारंग जोशी यांची स्पेशल एन्ट्री कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट