शनिवारी पर्सिस्टंट सभागृहात गाडगीळ यांचा ‘मुलखावेगळी माणसे’ हा गप्पांचा कार्यक्रम रोटरी क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांपासून ते भंगारविक्रेत्या बाईपर्यंत विविध लोकांशी गप्पा मारताना आलेले अनुभव त्यांनी या कार्यक्रमात रसिकांसमोर मांडले. पु. ल. देशपांडे आणि प्र. के. अत्रे यांच्या जोडीने पुण्यात बालपणी ऐकलेली कीर्तन-प्रवचने यांनी वक्तृत्वाचे संस्कार बालपणीच केल्याचे सांगत त्यांनी आपल्या पोतडीतील किश्श्यांचा खजिना उलगडला. पुलं आणि अत्रे यांच्या हजरजबाबीपणा, शकुंतला परांजपे आणि शंतनू किर्लोस्कर यांच्यासारख्या जुन्या पिढीतील ख्यातनाम व्यक्तींचे अनुभव सांगत गाडगीळ यांना संपूर्ण कार्यक्रमात रसिकांना गुंतवून ठेवले.
लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशी यांना त्यांच्या अप्रतिम गायकीसाठी सगळेच ओळखतात. मात्र, लतादीदी एका वेळेस १०-११ मिरच्या खातात आणि भीमसेनजींना नव्या गाड्या घेण्याची आणि त्या भरधाव वेगात चालविण्याची आवड होती. अनेक व्यक्ती मोठ्या होतात त्यामागे त्यांची साधनाही असते. केवळ रसिक पावसात बसले आहेत म्हणून वयाच्या ७८ व्या वर्षी छत्री न घेता तब्बल २३ गाणी आशा भोसले यांनी गायली होती. साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही कविता सादर केली. मात्र, त्या आधी त्यांनी संपूर्ण कवितेचा अर्थ व उच्चार समजून घेतली. रात्रभरात ती कविता पाठ केली, मोबाइलवर म्हणून दाखविली आणि मग दुसऱ्या दिवशी ती संमेलनात वाचून दाखविली. अशा मोठ्या माणसांना भेटल्यावर आपण किती लहान आहोत, याची जाणीव होते, असे गाडगीळ यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी, प्रमोद महाजन, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित अशा विविध मान्यवरांच्या मुलाखतींचे किस्सेही त्यांनी सांगितले. रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश मोकलकर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रफुल्ल माटेगावकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व आभार मानले.
पुण्यातील पेपरविक्रेत्याला हिटलरचे पत्र
पुण्यात पेपरविक्री करणाऱ्या ‘बाबुराव’ या सामान्य माणसाला प्रत्यक्ष हिटलरने पत्र पाठवून त्यांना जर्मनीत मोफत प्रवास आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. हे बाबुराव जर्मनी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये १० हजार कि.मी. शर्यतीत सहभागी झाले होते. त्यांच्या प्रवासाची सोय बडोद्याच्या संस्थानिकांनी करून दिली होती. ते धावत पुण्याहून लोणावळ्याला जात आणि ४५ मिनिटांत परत पुण्यात धावत येत असत. जर्मनीहूल लंडनला गेल्यावर त्यांना घेण्यासाठी ब्रिटीश अधिकारी आले होते. हे अधिकारी भारतात असताना त्यांना मराठी आणि हिंदी शिकवण्याचे काम बाबुराव करीत. ते गेले तेव्हा त्यांचे वय १०२ वर्षे होते आणि तोपर्यंत त्यांना डॉक्टरकडे जाण्याचे कधीही काम पडले नव्हते, असा अफलातून किस्सा गाडगीळांनी सांगितला. त्यांच्या अशा अनेक किश्श्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट