डॉ. गोविंदवार व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी कमलेश याच्या बहिणीचा ताजबाग परिसरातील तीन कोटी रुपयांचा साडेचार हजार चौरसफूट प्लॉट खरेदी केला होता. डॉक्टरांनी तिला पैसे दिले होते. दस्तऐवज पूर्ण तयार झाल्यानंतर ५६ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, दस्तऐवज पूर्ण तयार होण्यापूर्वीच कमलेश हा डॉक्टरांना त्रास देत होता. गुरुवारी सायंकाळी डॉ. गोविंदवार यांचा चालक बंडू हा त्यांची मर्सिडीज कार (एमएच-२९-एआर १३६२ ) घेऊन मुलांना शिकवणी वर्गाला सोडण्यासाठी गेला. स्नेहनगर पेट्रोल पंपासमोर कमलेश व त्याच्या साथीदाराने चालकाला अडविले. चाकूचा धाक दाखवून बंडू व मुलांना खाली उतरवून कार घेऊन कमलेश साथीदारासह पसार झाला. काही वेळाने कमलेश याने गोविंदवार यांना फोन केला. ‘चक्रधर स्वामी मंदिर परिसरात कार उभी आहे. हिंमत असेल तर कार घेऊन जा’, अशी धमकी त्याने गोविंदवार यांना दिली. डॉक्टरांच्या माहितीवरून पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. कार जप्त केली.
शिर्के हत्याकांडातील आरोपी विजय मते याच्यासह कमलेश हा बाहेर आला होता. दोघेही अनेक महिन्यांपासून फरार आहेत. कमलेश हा जमिनीचे व्यवहार करीत आहे, मात्र त्याच्याबाबत पोलिसांना काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पिस्तूलच्या धाकावर धनादेश बळकावला
कमलेश याने गोविंदवार यांना ५० लाखांची मागणी केली असता, त्यांनी वकिलांशी चर्चा केली. त्यानंतर पोलिस उपायुक्त दीपाली मासिकर यांना याबाबत माहिती दिली. गोविंदवार हे तक्रारदेण्यासाठी प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये गेले. यावेळी कमलेश याने गोविंदवार यांना फोन करून धमकी दिली. चालक बंडू याला पैसे व धनादेश घेऊन पाठविण्यास सांगितले. बंडू हा तुकडोजी चौकात गेला. त्याच्यामागे पोलिस होते. तेथून त्याने बंडू याला वर्धा मार्गावरील रॅडिसन ब्ल्यू चौकात बोलाविले. तेथे पिस्तूलचा धाक दाखवून त्याच्याकडील धनादेश हिसकावला व कमलेश पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, परंतु वाहतुकीमुळे पोलिस अडकले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट