Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

नाग नदीच्या परिसंस्थेचा मुळातून अभ्यास

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

नागपूरच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या नाग नदीचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी शनिवारी अनेक नागपूरकर एकत्र आले होते. जागतिक नदी दिवसाच्या निमित्ताने या नाग नदीशी संबं‌धित या अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी महाराजबागेजवळ नाग नदीच्या सान्निध्यात विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन नदी दिवस साजरा केला. इकॉलॉजिकल सोसायटीच्या समन्वयक प्राची माहूरकर यांनी नदीची परिसंस्था व तिचे महत्त्व विशद केले. ‘नदी प्रदूषित होण्यात नागरिकांचा असलेला सहभाग’ याविषयी देखील त्यांनी माहिती दिली. त्या निमित्ताने रसायनांचा दैनंदिन जीवनातील वापर कमी करण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले. आर्किटेक्ट प्रद्युम्न सहस्रभोजनी यांनी पाणी शुद्धीकरणासाठी विकेंद्रित पद्धतीचे महत्व समजावून सांगितले. अरण्य पर्यावरण संस्थेचे राज मदनकर हेदेखील यावेळी उपस्थित होते. या निमित्ताने नदीकाठचे पक्षी व जैवविविधतेचे निरीक्षणही केले गेले. राजेंद्र प्रधान व वाइल्ड-सीईआरचे डॉ. बहार बावीस्कर यांनी यावेळी उपयुक्त माहिती दिली. नदीकाठच्या निसर्गाबद्दल डॉ. राजकुमार खापेकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ‘अलग अँगल’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नदीकाठी बसून नदीची चित्रे काढली. त्यांना तनुल विकमशी व मिली विकमशी यांनी मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थी, नागरिक, कलाकार, अभ्यासक या अभ्यासात सहभागी झाले होते.

उगम ते संगम... आज उलगडणार प्रवास

याच कार्यक्रमांतर्गत आज, रविवारी ‘नाग नदी : उगम ते संगम’ या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता लावा गावातील उगमाकडे जाण्यासाठी एलएडी कॉलेजच्यासमोर इच्छुकांनी आपली वाहने घेऊन एकत्र यावे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी ९८२३६१२४६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राची माहूरकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles