संविधान हा देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे. दलित, शोषित, पीडितांना राजकीय, आर्थिक व शैक्षणिदृष्ट्या मागासलेल्यांना जगण्याचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी एससी, एसटी प्रमाणेच कलम ३४०नुसार ओबीसींनाही समान हक्काची तरतूद घटनेत केली. मात्र या घटनादत्त अधिकारापासून ओबीसी वंचित आहे. अधिकार मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला भीक नको, आमचे अधिकार हवेत, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
अर्जुनी-मोरगाव येथे ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने ओबीसी चेतना रथयात्रेचा शुभारंभ तथा ओबीसी महामेळावा संविधानदिनी घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, विशेष अतिथी म्हणून ओबीसीचे महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे,ओबीसी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, मनोहर चव्हाण, किशोर तरोणे, अमर वऱ्हाडे, शेषराव गिऱ्हेपुंजे, डॉ. शामकांत नेवारे, डॉ. गजानन डोंगरवार, भागवत नाकाडे, प्राचार्य परशुरामकर, प्रमोद लांजेवार, नामदेव कापगते आदी उपस्थित होते. पटोले म्हणाले, ओबीसींच्या उत्थानासाठी स्वतंत्र मंत्रालय झालेच पाहिजे यासाठी आमचा लढा कायम राहील. ८ डिसेंबरला ओबीसींनी लाखोच्या संख्येने मोर्च्यात सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी. दरम्यान, इंग्रज राजवटीत ओबीसींची जनगणना होते. मात्र स्वतंत्र भारतात जनगणना केली जात नाही. यामुळेच घटनेत नमूद असतानादेखील ओबीसी अधिकार व हक्कापासून वंचित राहत असल्याचे मत डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले. राजकीय पक्ष समन्वयक डॉ. खुशाल बोपचे, बबलू कटरे यांनी आपल्या भाषणातून ओबीसी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. भारतीय संविधानाचे पूजन करून चेतना रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. बबलू कटरे यांनी उपस्थितांना संविधान शपथ दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट