म. टा. प्रतिनिधी, नागपूर
सरासरी दर शंभर नागरिकांमध्ये किमान वीसजण तणावाच्या स्थितीचा सामना करतात. त्यापैकी आठ ते दहा जणांना मानसोपचाराची गरज भासते. मानसिकदृष्ट्या आजारांची संख्या वाढत आहे. नागपूर विभागात आज ५५ मानसोपचार तज्ज्ञ कार्यरत आहेत. सरासरी काढली तर ६०० रुग्णांमागे केवळ एक मानसोपचार तज्ज्ञ कार्यरत आहे.
दुसरीकडे विदर्भातल्या एकाही सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर शिक्षणाची सोय नाही. राज्यात फक्त सर जे. जे. ग्रांट मेडिकल कॉलेज आणि पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्येच मानसोपचार हा विषय समाविष्ट आहे. राज्यातील सर्वच शासकीय महाविद्यालयांमधल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासह पदवीतही हा विषय समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आगामी वर्षभरात पाठपुरावा केला जाईल, असे इंडियन सायक्रॅटिक सोसायटीच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आनंद सावजी यांनी येथे सांगितले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अलीकडेच सुरू झालेला सायक्रॅटिक वॉर्ड धोक्यात आला आहे. वैद्यक परिषदेच्या निकषात पात्र ठरत नसल्याने या वॉर्डावरचे संकट आणखी गहिरे झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी 'मटा'ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या विषयाच्या बाबतीत वैद्यकीय क्षेत्रातच जनजागृतीचा अभाव असल्याचे नमूद करीत डॉ. सावजी म्हणाले, 'सध्याच्या जीवनशैलीचा विचार केला तर ताणतणावाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात वाढत आहेत. नागपूर विभागात आज ५५ मानसोपचार तज्ज्ञ कार्यरत आहेत. संपूर्ण विदर्भात केवळ ९५ मानसोपचार तज्ज्ञ आहेत. एकीकडे ही वस्तुस्थिती असताना वैद्यकीय अभ्यासक्रमातही हा विषय फारसा गांभीर्याने घेतला जात नाही. पदव्युत्तरच्या पोस्टिंगमध्ये फार फार तर दोन आठवड्यांमध्ये हा विषय गुंडाळला जातो. त्यामुळे रुग्ण वाढत असताना त्याचा ताण डॉक्टरांनाही सोसावा लागतो.'
या विषयावर प्रकाश टाकताना डॉ. सुशील गावंडे म्हणाले, पदव्युत्तर आणि पदवी अशा दोन्ही अभ्यासक्रमात हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय समाविष्ट करणे गरजेचे आहे. त्यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र मेडिकल काउंसिल, आयएमए आणि इंडियन सायकॅट्रिक सोसायटी या सर्वांनी एकत्र येऊन अभ्यासक्रमाची फ्रेमवर्क तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागपूर शाखा आगामी काळात निश्चित प्रयत्न करेल.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट