म.टा. प्रतिनिधी, नागपूर
आसाम चहाच्या नावाखाली सध्या खुल्या चहापत्तीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. पण, या चहापत्तीत भुसा मिश्रीत करून खूप कमी किमतीत त्याची गुपचूप विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. सत्ताधारी-विरोधक आज, रविवारी चहापान घेत असताना ही बाब विचार करायला लावणारी आहे.
नागपूर ही मध्य भारतातील प्रमुख बाजारपेठ आहे. यामुळे संपूर्ण मध्य भारतातील सामानांची उलाढाल येथून होते. अशातच आता मागील काही वर्षांत खुली चहापत्ती विक्रीला येऊ लागली. आसाम टी, बादशाह चहा, बंगाल टी अशी त्यांची नावे आहेत. पण नेमका हा खुला चहा आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी ‘मटा’ने बाजाराचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये नागरिकांच्या थेट जीविताला धोका पोहोचविणारी माहिती समोर आली.
इतवारी किराणाओळ, धान्यबाजार हा सर्व प्रकारच्या खाद्यान्नांचा घाऊक बाजार आहे. जवळपास संपूर्ण मध्य भारतातील धान्याची उलाढाल येथून होते. पण, तेथीलच काही दुकानांमध्ये ‘नकली चहापत्ती’ असे विचारले असता स्वस्त दरातील पत्ती मिळत असल्याची माहिती समोर आली. मग ही स्वस्त दरातील पत्ती नेमकी आहे काय? हे ‘मटा’ने जाणून घेतले. नागपूरच्या बाजारात खुली चहापत्ती आसामहून येत असल्याचे सांगितले जाते. त्यांचा दर घाऊक बाजारात साधारणत: १२० रुपयांपासून ते १५० रुपये किलो आहे. पण ‘ही नाही, ती नकलीवाली व स्वस्तवाली चहापत्ती आहे का?’ असे विचारले तेव्हा विक्रेते आधी शांत होते. पण नंतर त्यांनी ही पत्ती काय आहे, ते सांगितले. अवघ्या ७० ते ९० रुपये किलोने मिळणाऱ्या या चहापत्तीत लाकडाचा भुसा असतो. ५० किलो पोत्यामध्ये साधारणत: ५ किलो भुसा भरला जातो. ही पत्ती अत्यंत बारीक असते. भुसा वेगळा दिसू नये यासाठीच ती खूप बारीक ठेवली जाते. पण, सहसा ही पत्ती साधारण ग्राहकांना विक्री केली जात नाही. नेहमीच्या व ओळखीच्या ग्राहकांनाच आगावू सुचनेनुसार ती उपलब्ध करून दिली जाते. यामुळेच दुकानात थेट ही चहापत्ती विक्री होत नाही. मग मागणी केल्यास थेट गोदामांमधून ती दिली जाते. कारण भुसा मिश्रीत करण्याचे काम गोदामातच चालते, एका विक्रेत्याचे सांगितले.
खुली अथवा सुटी चहापत्ती विक्री करणारे नागपुरात जवळपास २२ ते २५ घाऊक विक्रेते आहेत. याशिवाय अन्य काही विक्रेतेदेखील अशी चहापत्ती थेट बोलवून विक्री करतात. पण भुसामिश्रीत चहापत्ती सहसा मध्य प्रदेशातून येते, असे सांगितले जाते.
‘पांढऱ्या’चा काळा धंदा
नागपूर : अधिवेशनासाठी नागपुरात आलेले पाहुणे सरकार रविवारी चहापान घेत आहेत. पण, नागपूरकरांचा चहा मात्र भेसळयुक्त आहे. याचे कारण २०-३० लिटरचा छोटा व्यावसाय करणारे बिनधास्त त्यात पाणीमिश्रीत करतात. हा धंदा पहाटे चालतो.
नागपूर शहरात आधी केवळ तीन प्रमुख दूधकंपन्या होत्या. मागील वर्षभरात मध्य प्रदेशसोबतच बाहेरील काही काही कंपन्या येथे आल्या आहेत. अशाप्रकारे सात प्रमुख कंपन्या रोज साधारणत: साडे तीन ते चार लाख लिटर दुधाचा पुरवठा नागपूरला करतात. पण या कंपन्यांची दूध पुरविण्याची रचना अशी आहे की दुधात पाणी मिश्रीत करून त्याची विक्री करणे खूप सोपे आहे. दूध कंपन्यांमधील दुधाच्या गाड्या पहाटे ३ वाजता मुख्य वितरकाकडे येतात. एक वितरक साधारणत: ८०० ते १ हजार लिटर दूध कंपन्यांकडून घेतो. त्यानंतर या किरकोळ वितरक या वितरकाकडून साडे तीन ते चार दरम्यान दूध घेऊन जातात. हे किरकोळ विक्रेते १०० ते १५० लिटर दुधाची विक्री करतात. पण याच विक्रेत्यांकडे पहाटे ४ वाजता घरोघरी दूध वाटणारे मुले येतात. ही मुले २०, ३० तर कधी ४० लिटर दूध घरोघरी देण्यासाठी घेऊन जातात. आणि मुलेच नेमकी दूध भेसळ करणारी असतात. अशा काहींची ‘मटा’ने माहिती घेतली.
ही मुले पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान दूध घेऊन आपल्या घरी अथवा ठरलेल्या ठिकाणी जातात. तिथे दुधाच्या पिशवीला बारीक काप दिला जातो. प्रत्येक एक लिटरच्या पिशवीतून ३०० मि.ली. दूध काढून त्याजागी पाणी भरले जाते. त्यानंतर फक्त पिशवी सीलबंद करण्याच्या यंत्राने ती बंद केली जाते. हे यंत्र इतवारीसारख्या भागात अवघ्या ६०० ते ८०० रुपयांत मिळते. पण मग पिशवीतून काढलेल्या दुधाचे काय केले जाते? असा प्रश्न निर्माण होतो. तर रस्तोरस्ती असलेले चहा ठेलावाले त्यांच्याकडील वापरलेल्या दुधाच्या पिशव्या यांना प्रती पिवशी १ किंवा दिड रुपया दराने विक्री करतात. त्या पिशव्यांचा उपयोग केला जातो. मूळ पिशवीतून काढलेले दूध पुन्हा त्यात भरले जाते व विक्री केले जाते. यामुळे मुळात घरोघरी दूध वाटप करणारे छोट्या विक्रेत्यांबाबत सर्वसामान्यांनी सजग राहण्याची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट