म.टा.प्रतिनिधी, नागपूर
विदर्भातील जंगल पर्यटन देशभरात ‘हिट’ व्हावे म्हणून राज्याच्या वन विभागाने दिल्लीत जाऊन डिजिटल प्रमोशन करण्याचा नवा पर्याय यंदा वापरला आहे. दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग मेळाव्यात यंदा पहिल्यांदाच हा अभिनव प्रयोग करण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय उद्योग मेळाव्यासाठी देशातून आणि देशाबाहेरून आलेल्या पर्यटकांना विदर्भातील जंगल पर्यटनाबद्दल माहिती मिळावी म्हणून वनविभागाने तेथे विशेष पॅव्हेलियन उभ केले होते. डिजिटल महाराष्ट्राच्या संकल्पनेला पूरक असा ‘डिजिटल वन पर्यटन’चा पर्याय यावेळी पर्यटकांना देण्यात आला. भेट देणाऱ्या पर्यटकांना व्हर्चुअल जंगल आणि व्हर्चुअल पर्यटन स्थळे यांच्या माध्यमातून विदर्भातील वन वैभव आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमोर मांडण्यात आले. या शिवाय, सेल्फी स्टेशनसारखा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. २७ नोव्हेंबरपर्यंत दिल्ली येथे संपलेल्या मेळाव्यात सुमारे ५ ते ६ लाख पर्यटकांनी भेट दिल्याचा दावा राज्याच्या वन विभागाने केला आहे.
‘कान्हा किंवा मध्य प्रदेशातील जंगलांबद्दल देशभरात बरीच माहिती आहे. मात्र, ताडोबा किंवा पेंच येथील वनवैभव किंवा वन्यजीवनाबद्दल इतरत्र तुलनेने फारच कमी माहिती आहे. आपल्या येथील व्याघ्र प्रकल्पांचे जोरदार मार्केटिंग करण्याचा प्रयत्न या मेळाव्यात केला. राष्ट्रीय स्तरावर व्याघ्र प्रकल्पांचे अशा प्रकारे मार्केटिंग करण्याची पहिलीच वेळ होती. या पुढाकारामुळे येत्या काळात विदर्भातील जंगलांमध्ये देशभरातील पर्यटकांची संख्या सध्याच्य तुलनेत वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे,’ असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनीता सिंह यांनी मटाशी बोलताना सांगितले. सिंह यांच्या नेतृत्वात पर्यटन विभागाची चमू या मेळाव्यात सहभागी झाली होती.
दरम्यान, वनपर्यटनाच्या प्रसिद्धीची संकल्पना केवळ महाराष्ट्रानेच राबविली होती. राज्यातील वनपर्यटन आणि राष्ट्रीय उद्यानांची माहिती थ्रीडी आणि फाइव्ह डी स्क्रीन्सच्या माध्यमातून यावेळी पर्यटकांना देण्यात आली. ‘व्हर्चुअल टूरिझम’ च्या संकल्पनेलाही भरपूर प्रतिसाद मिळाल्याचेही सिंह यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट