प्रवासी भत्त्यांचा दुरुपयोग केल्यावरून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ सहायकांविरोधात कारवाई करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेने त्यांच्याविरोधात कारवाई केली नसल्याने आश्यर्च व्यक्त केले जात आहे.
वरिष्ठ सहायक प्रमिला बाकडे यांनी पदाचा दुरुपयोग करून प्रवासी भत्त्यांची उचल केल्याचा दावा केला जात आहे. याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिले होते. सोबतच २५ जुलै २०१६ रोजी कक्ष अधिकारी अ. त्र्यं. जाधव यांनी नागपूर जिल्हा परिषदेला पत्र पाठवून तक्रारीची शहानिशा करून कार्यवाही करावी, असे सांगितले. पण, पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही कारवाई झालेली नाही. प्रकरण असे, बाकडे यांनी २९ एप्रिल ते ४ मे २०१३ या कालावधीत रजा प्रवास सवलतीचा लाभ घेतला. पण, बाकडे यांनी प्रवास भत्त्यांच्या कागदपत्रांसोबत तिकिट जोडलेले नाही. तरीही, ४ हजार ८०८ रुपयांची उचल करण्यात आली. ही रक्कम जिल्हा परिषदेकडे अजूनही जमा करण्यात आलेली नाही. पदाचा दुरुपयोग करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट