Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

बसने तीन युवकांना चिरडले

$
0
0

म.टा. प्रतिन‌िधी, नागपूर

भरधाव एसटी बसने मोटरसायकल धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नागपूर-काटोल मार्गावरील कोहळी गावाजवळ घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काळ या मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. अर्जुन रमेश देशमुख (वय २१), जनार्धन रमेश चुरे (वय २५) व राजेश शिवराम श्रीवास्तव (वय २०), असे मृतकांची नावे आहेत. ते तिघेही अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील शहापूर येथील रहिवाशी होते. पोलिसांनी याप्रकरणी एसटी बसचा (क्र. एमएच ४०-वाय ५५०५) चालक कैलास नथ्थुजी शेळके (वय ४२, रा. चिंचोली, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) यास अटक केली आहे.

अर्जुन आणि राजेश हे काही कामानिमित्ताने शनिवारी मोटारसायकलने नागपूर येथे आले होते. नागपुरात त्यांची जनार्धनशी भेट झाली. काम आटोपल्यानंतर ते तिघेही रात्री ८ वाजताच्या सुमारास एकाच मोटारसायकलने वरुडकडे निघाले. दरम्यान, काटोलवरुन नागपूरकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने कोहळी शिवारात त्यांच्या मोटारसायकल जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ते तिघेही रस्त्याच्या बाजूला फेकल्या जाऊन त्यांची मोटारसायकल बसच्या समोरच्या भागात अडकली. अपघातानंतर बसचालकाने बस न थांबविता तेथून पळ काढला. काही नागरिकांनी पाठलाग करून ती बस कोहळी बसस्थानकावर रोखली. तोपर्यंत मोटारसायकल ही बसच्या समोरील भागातच लटकलेली होती.

अपघातानंतर नागरिकांनी बसचालकाविरुद्ध संताप व्यक्त करीत नागपूर-काटोल मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी जावून नाग‌रिकांची समजूत काढत पोलिसांची कारवाई योग्य प्रकारे व्हावी, यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिक शांत झाले. बसचालक कैलास शेळके हा दारू पिऊन बस चालवित होता, अशी तक्रार नागरिकांनी केल्याने पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेवून ते वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सुरेश भोयर यांच्या मागर्दशनाखाली कळमेश्वरचे पोलिस निरीक्षक बहादुरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>