स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून बाहेर फेकल्या गेलेल्या नागपूर शहराची दुसऱ्या टप्प्यात निवड व्हावी, यासाठी फ्रान्सचे चार सदस्यीय पथक आठवडाभर शहरात राहणार आहे. बुधवारी पथकाने मनपातर्फे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाचे सादरीकरण पाहिले. तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. फ्रान्सची एएफडी ही संस्था नागपूरसह चंदीगड, पड्डूचेरीला तांत्रिक सहकार्य करणार आहे.
फ्रान्स पथकाचे नेतृत्व कार्यक्रम अधिकारी शेख दिया करीत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंमेंट फोर्ची, नगररचनाकार सेबेस्टीयन रोनॉल्ड, नगररचनाकार फेट्रीस बर्जी आदींचा सहभाग आहे. यापथकाने बुधवारी मनपाच्या प्रशासकीय कार्यालयातील सभागृहात मनपाचा स्मार्ट सिटीसाठी तयार असलेल्या प्रस्तावाचे अवलोकन केले. मनपा अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाचे सादरीकरण केले. या बैठकीत प्रकल्पांचे मानचित्रण, वैचारीक परिकल्पना व कार्यशाळा आदींवर चर्चा केली. मंगळवार, ३१ मे रोजी फ्रान्स पथकाच्या उपस्थितीत मनपाचे अधिकारी, या प्रकल्पातील भागीदार, स्वयंसेवी संस्था, निमशासकीय संस्था व नागरिकांसोबत कार्यशाळेत चर्चा करतील.
बुधवारच्या सादरीकरणात मनपातर्फे गेल्या तीन वर्षात पूर्ण झालेले प्रकल्प, प्रगतीपथावरील प्रकल्प व प्रस्तावित प्रकल्पांची यादी व संक्षिप्त माहिती देण्यात आली. यापूर्वी स्मार्ट सिटीसाठी सादर केलेल्या प्रस्तावात सुधारणा करून परिपूर्ण अहवाल तयार करण्यास हे पथक मनपाला मदत करणार आहे. तसेच यासाठी आवश्यक तांत्रिक सहकार्यही देणार आहे. पथकाच्या आठवड्याभराच्या मुक्कामात स्मार्ट सिटीतील पारडी, पुनापूर, भरतवाडा या भागालाही भेट देण्यात येणार आहे. शिवाय, पॅन सिटीबाबतही माहिती घेण्यात येईल. सध्या शहरात सुरू असलेले नाग नदी स्वच्छता अभियान व भांडेवाडी येथे प्रस्तावित प्रकल्पाचीही माहिती घेतील. नासुप्र, मेट्रो रेल्वे, मिहान, महानिर्मिती, नीरी, एमआयडीसी, एमएसआरडीसी आदी विविध विभागांशीही चर्चा करणार आहे.
फ्रान्स चमुसमोर बुधवारी झालेल्या सादरीकरणाला अतिरीक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनावणे, उपायुक्त रंजना सोनावणे, अतिरीक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक, नगररचनाच्या सहायक संचालक सुप्रिया थुल, आरोग्य विभागाचे अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, क्रीसीलचे ब्रिजमोहन लड्डा व दर्शन पारीख तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, या सादरीकरणावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर हे त्यांच्या आईच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी सुमारे तासभर फ्रान्सच्या पथकासमोर सादरीकरण होत असताना उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट