स्टिव्हन जॉन्स सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला मिट्ट काळोखात लोटले. आपल्याला यापुढे दिसणार नाही, हे कळण्याचेदेखील त्याचे वय नव्हते. पण, काळोखाआड पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग त्याने कधीच सोडला नाही. सप्तसुरांच्या साथीने आव्हाने पेलत त्याने आता बारावीच्या परीक्षेतही राज्यात बाजी मारली आहे. थक्क करणारी ही यशकथा आहे, अनिकेत बेंडे या दृष्टिहीन मुलाची. बारावीच्या परीक्षेत कला शाखेतून अनिकेतने दृष्टिहिन गटातून ८८ टक्क्यांचा डोंगर सर करीत राज्यात पहिला क्रमांक राखला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी हाच अनिकेत दहावीच्या परीक्षेतही राज्यात टॉप राहिला आहे.
एक पाठी असलेल्या अनिकेतने आतापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीत एकाही शिकवणी वर्गाची पायरी चढलेली नाही. आई मनीषा अनिकेतचा पहिला गुरू. मुलाला नियतीने दिलेले परावलंबित्व पचविणे सोपे नसते. पण, या माउलीने हे बळ स्वतः पचविले नाही तर मुलालादेखील त्यासाठी तयार केले. कितीही आव्हाने आली तर हार पत्करायची नाही, हे बळ अनिकेतमध्ये फुंकत मनीषा मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. आईने पुस्तकातला धडा एकदा वाचून दाखविला की अनिकेतच्या मेमरीत तो फिट होतो. त्यानंतर अनिकेत स्वतः ब्रेल लिपीतून त्याच्या नोट्स तयार करतो. सातवीपासून अनिकेतने या सरावात एका दिवसाचाही खंड पडू दिलेला नाही. अभ्यासाचा हाच फंडा वापरून त्याने दोन वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेतही ९१ टक्के गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. डॉ. दत्ता हरकरे यांच्याकडून संगीताचे धडे गिरविणाऱ्या अनिकेतने सुगम संगीताची एक तर शास्त्रीय संगीताच्या तीन परीक्षादेखील उत्तीर्ण केल्या आहेत. सप्तसुरांच्या साथीने आता अनिकेतला यूपीएससीतही टॉप करायचे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट