'नोकरी मिळाली, ती आरामात करू, पेन्शन घेऊ आणि घरी बसू... हे सरकारी नोकरीचे दिवस आता गेले. आताचे दिवस स्वत:च्या हिमतीवर पुढे जाण्याचे आहेत. स्वत:मध्ये कौशल्य असल्यास खासगी क्षेत्रात सरकारी नोकरीपेक्षा जलद समोर जाता येते', असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे शुक्रवारी जिल्ह्यातील युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या समारोपात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा प्रशिक्षणार्थ्यांशी थेट संवादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी तीनवेळा सरकारी नोकरीचे दिवस गेल्याचा उल्लेख करून भविष्यातील संकेतच दिले.
'आज जगाचा विचार केला तर चीन, जपान असो वा अमेरिका अथवा युरोप, या सर्व विकसित देशांचे सरासरी वय हे ३७ ते ४८ दरम्यान आहे. केवळ भारतातील नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे आहे. अशाप्रकारे या विकसित देशांना आगामी काळात येथीलच मनुष्यबळाची सर्वाधिक गरज असेल. हे मनुष्यबळ देशात तयार होण्यासाठी कौशल्याची गरज आहे. आपल्या देशाला २०२२ मध्ये ५२ कोटी कुशल मनुष्यबळाची गरज असेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. पण त्यातील चार वर्षे निघून गेली. तरीही पुढील आठ वर्षांत हे लक्ष्य मिळविण्यासाठीच आता अशाप्रकारचा उपक्रम केंद्र सरकारने व राज्य सरकारने हाती घेतला आहे', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
'देशाला विकासाकडे न्यायचे असल्यास मनुष्यबळाचा विकास आवश्यक आहे. हे मनुष्यबळ कौशल्य विकासाशिवाय तयार होणे अशक्य आहे. एकूणच रोजगारयुक्त महाराष्ट्र आणि कौशल्ययुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेऊन हे काम करण्याची गरज आहे. अशा सर्व स्थितीत सरकारी नोकरीपेक्षा खासगी नोकरी ही आयुष्यात कौशल्याच्या आधारे समोर जाण्याची संधी आहे', असे मुख्यमंत्री म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे भारताचे प्रमुख क्लेमो शेव्ह यांनी यावेळी अशाप्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज काय, हे विशद केले. अखेरीस त्यांनी तुटक्या मराठीत धन्यवाद देण्याचा केलेला प्रयत्न दाद मिळवून गेला. राज्य सरकारच्या कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे सचिव दीपक कपूर आणि या कामासाठी सरकारला सहकार्य करणाऱ्या 'प्रथम' या संघटनेचे प्रमुख माधव चव्हाण यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आभार मानले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके, कौशल्य विकास आयुक्त विजय वाघमारे, विभागीय आयुक्त अनुप कुमार यावेळी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट