म.टा. प्रतिनिधी नागपूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपने शहरभर आरोग्य शिबिरांचा धडाका लावला. दक्षिण पश्चिम मंडळाने मुंडले शाळेत भव्य आरोग्य कुंभ उभारला. मध्य नागपुरात दंदे फाउंडेशनच्या सहाय्याने आरोग्य शिबिर घेतले गेले. पूर्व आणि उत्तर नागपुरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकंदरीत नागपूरकरांना हेल्दी गिफ्ट देण्यात आले.
भाजपच्या दक्षिण पश्चिम शाखेतर्फे आयोजित आरोग्य शिबिरात गेल्या आठ दिवसांपासून हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या जवळजवळ ४५० रुग्णांना शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करून घेण्यात आले. या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून प्री अॅप्रुव्हलची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. या रुग्णांवर मेडिकलच्या चार शल्यचिकित्सागृहातील १४ ऑपरेशन टेबलवर शस्त्रक्रियेची फेरीदेखील सुरू झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेडिकलमध्ये दाखल करून घेण्यात आलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण हे नेत्ररोगाशी निगडित व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यापैकी तब्बल २४९ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे. तर उर्वरित शंभर जणांना काचबिंदू आढळून आला आहे. या रुग्णांवर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, मेडिकलमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. अशोक मदान शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यासाठी त्यांना मेडिकलमधील नेत्र विभागाचे १३ व १४ क्रमांकाच्या आंतररुग्ण विभागात दाखल करून घेण्यात आले आहे. सोबतच सामान्य शल्यक्रियेची गरज असलेल्या रुग्णांमध्ये प्रत्येकी ४० जणांना हर्निया, हायड्रोसिल, अॅपेंडिक्सचे निदान झाले आहे. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया होणार आहेत. याखेरीज अस्थिरोग शल्यचिकित्सेची गरज असलेल्या ११० जणांनाही पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.
--दोन हजार रुग्णांची तपासणी
नागपूर : गडकरींच्या वाढदिवसानिमित्त प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था आणि डॉ. दंदे फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित सर्वरोग उपचार शिबिरात दोन हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
महाल परिसरातल्या रेशीमबाग येथील सानेगुरुजी उर्दू प्रशालेच्या प्रांगणात हे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात प्रामुख्याने कान, नाक, घसा, डोळे यांच्यासह हृदय, अस्थिरोग, कर्करोग, मूत्रपिंड विकार, मेंदू, मानसिक आजार, स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र, श्वसन संस्थेसह कर्करोगाच्या रुग्णांचीही आरोग्य तपासणी करून त्यांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली. ज्या रुग्णांना पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियांची गरज आहे, अशा रुग्णांवर डॉ. दंदे फाउंडेशनच्यावतीने रविनगर येथील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
या शिबिरात प्रामुख्याने ३० तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममध्ये मेडिसिनतज्ज्ञ डॉ. गिरीश देशपांडे, डॉ. जयेश तिमाने, डॉ. हरी गुप्ता, अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. सत्यजित जगताप, डॉ. सिद्धार्थ जगताप, कार्डिऑलॉजिस्ट डॉ. पुष्कराज गडकरी, किडनीतज्ज्ञ डॉ. अमित पसारी, मेंदुरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश केळकर, सामान्य शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण भिंगारे, डॉ. नरेश राव, डॉ. सुशील सोळंकी, कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. देवेंद्र माहोरे, डॉ. भाग्यश्री बोकारे, बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ. राजेश अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा दंदे, डॉ. रागिणी मंडलिक, डॉ. शशिकांत रघुवंशी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी आदींनी रुग्णतपासणी केली. यासह २० निवासी डॉक्टर्स, २० पॅथॉलॉजिस्ट, ३० नर्सेस, पाच औषध चिकित्सकांसह शंभर जणांच्या टीमने मेहनत घेतली. महाशिबिराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.
--दोघांना तोंडाचा कर्करोग
महाआरोग्य शिबिरात शुक्रवारी झालेल्या दंत आरोग्य तपासणी शिबिरात ५३२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोघांना मुखाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. याखेरीज २० जणांना फायब्रोसिस अर्थात तोंड न उघडण्याचा आजार जडल्याचे आढळले. एक्स्ट्रॅक्शनचे ९५ रुग्ण आढळून आले. या शिबिराचे निमित्त साधून १० जणांनी तंबाखू, खर्रा कायमचा सोडण्याची शपथही ग्रहण केली.
--नेत्यांची मांदियाळी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी नागपुरात हजेरी लावली व गडकरींना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ट्विट करून गडकरींचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, पंचायत राज निहालचंद मेघवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गडकरींना शुभेच्छा दिल्या. ' असेच प्रेम कायम राहू द्या' असे म्हणत गडकरींनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट