कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकल्याने त्याच्या भावात घट झाल्याच्या निषेधार्थ प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाकचेरी परिसरात कांदे मोफत वाटले. नापिकी व विविध कारणांनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना कांद्याचे भाव अत्यंत कमी झाल्याने निराश केले आहे. कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात अडकल्याने प्रहारने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोफत कांदा वाटपाची घोषणा केली होती.
त्यानुसार आमदार बच्चू कडू कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले. सोबत आणलेल्या कांद्याचे त्यांनी वाटप सुरू केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. यानंतर कडू व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील मोफत कांदे दिले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. नाफेड मार्फत पंधराशे रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणयात यावा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शंभर टक्के अनुदानावर कांदा चाळी निर्माळ करण्यात याव्यात, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी किंमतीमध्ये वेअर हाऊस उपलब्ध करून द्यावेत, शेतकरी हितार्थ स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा आदी मागण्या त्यांनी केल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट