पहिल्यांदा झालेल्या ऑनलाइन टायपिंग परीक्षेच्या निकालाची टक्केवारी घसरली असली, तरी पारदर्शक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारी, ऑनलाइन टायपिंग परीक्षेचा निकाल घोषित केला. यात मराठी आणि हिंदी टंकलेखन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ टक्के, तर इंग्रजीचा निकाल २७ टक्के घोषित झाला आहे.
ही परीक्षा १७ ते २४ एप्रिलदरम्यान राज्यातील ७८ केंद्रांवर घेण्यात आली. तर, नागपूर जिल्ह्यातील ३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. मराठी आणि हिंदी टंकलेखन परीक्षेसाठी ३ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील २ हजार ९२१९ विद्यार्थी उपस्थित, तर ५३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. यापैकी ४४७ विद्यार्थी उत्तीर्ण, तर तब्बल २ हजार ४७९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मराठी आणि हिंदी टंकलेखन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ टक्के आहे. इंग्रजी टंकलेखन परीक्षेसाठी ५ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ४ हजार ९५१ उपस्थित होते. उत्तीर्णांची संख्या १ हजार ३४२, तर ३ हजार ५१७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. इंग्रजीचा निकाल २७ टक्के घोषित झाला आहे. विद्यार्थ्यांना मुळ गुणपत्रिका सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून आणि संबंधित टंकलेखन संस्थेतून प्राप्त करता येतील.
सरावातून विद्यार्थी घडणार
ऑनलाइन परीक्षेची टक्केवारी कमी आहे. मात्र, या परीक्षेतून पारदर्शकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. यापूर्वी झालेल्या मॅन्युअली टायपिंग परीक्षेत सावळागोंधळ उघडकीस येत होता. आता ऑनलाइन टायपिंग परीक्षेत गैरव्यवहाराला वाव नसल्याने हुशार विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळाल्याने सरावही करता आला नव्हता. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना भरपूर वेळ मिळणार असून ऑनलाइन टायपिंगची क्रेझ वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट