केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुसूचित जाती,जमाती व बीपीएल विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो. मात्र, वर्ग १ ते ८पर्यंत इतर मागास व खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. एवढेच नव्हे, तर यावेळी नर्सरी, केजी वन आणि टूच्या विद्यार्थ्यांनाही मनपाच्या निधीतून गणवेश देण्यात येणार आहे. मंगळवार, ३१ मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
शैक्षणिक सत्र २०१६-१७मध्ये मनपाच्या शाळांमधून इयत्ता १ ते ८मधील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत केवळ अनुसूचित जाती, जमाती व बीपीएल विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा नियम आहे. मात्र, मनपाने सर्वच विद्यार्थ्यांना २ जोड गणवेश देण्याचा मानस व्यक्त केला आहे. यात नर्सरी, केजी वन आणि टूमध्ये शिकणारे १३२० विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यासाठीचा निर्णय घेण्याची बाब आर्थिक असल्याने यासंबंधीचा ठराव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार गणवेशाचे कापड व शिलाईचे दर निश्चित करून कंत्राट दिला जाणार आहे. यासाठी संधू क्रिएशन, विन्टेक्स यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, आर. के. ट्रेडर्स, स्टार युनिफॉर्म, पोद्दार सेल्स कार्पोरेशन, काई्टस अॅण्ड सन्स आणि प्रिया गारमेन्ट्स या एजन्सीची नावे पुढे आली आहेत.
सिवर ट्रंकलाइन कोणत्याही इमारतीला नुकसान न पोहोचविता हिंगणा टी-पॉइंट ते सहकारनगर घाट या मार्गावर ८.७२ कोटी रुपये खर्चकरून सिवर ट्रंकलाइन टाकण्यात येणार आहे. इमारतींना धोका झाल्या यासाठी नेमणूक करण्यात आलेली तापी प्रिस्ट्रेट ही कंपनी जबाबदार राहणार आहे. मनपाकडे नुकसानीची जबाबदारी राहणार नसल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी उत्तम तांत्रिक व आधुनिक तंत्रज्ञानाच वापर करण्यात येणार आहे. या मशिनरीमुळे कोणत्याही इमारतीला धोका होणार नसल्याचे सांगण्यात आले. ड्राइंगच्या कामाच्या डिझाइनला मुख्य अभियंत्यांची मंजुरी मिळाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट