अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा कारभार नागपूरकडे आल्यानंतरचे पहिले आणि ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा कुठे होणार याबद्दल उत्सुकतेचे वातावरण आहे. साहित्य संमेलन आयोजित करू इच्छिणाऱ्या तीन संस्थांकडून आतापर्यंत निमंत्रणे आली असून आणखी संस्थांनी त्यासाठी पुढे यावे, याकरीता १५ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे.
दरवर्षी साहित्य संमेलन आयोजित करणे बंधनकारक नसले, तरीही हे संमेलन ऐश्वर्यसंपन्नतेचे प्रदर्शन टाळणारे व बडेजावविहीन स्वरूपात, साधेपणाने, मात्र दरवर्षी व्हावे, असे महामंडळाने नागपूर येथे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत ठरवले होते. त्यानुसार ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करू इच्छिणाऱ्या संस्थांकडून या संमेलनासाठी अगोदर आलेल्या निमंत्रणासोबतच महामंडळाच्या कार्यालयाकडे नव्याने पाठविल्या जाणाऱ्या निमंत्रणांचाही विचार केला जाणार आहे.
आतापर्यंत महामंडळाला आग्री युथ फोरम डोंबिवली, महाराष्ट्र साहित्य परिषद शाहू पुरी शाखा (सातारा) आणि सार्वजनिक वाचनालय कल्याण या तीन ठिकाणची निमंत्रणे प्राप्त झालेली आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या संस्था यंदाचे संमेलन आयोजित करण्यास इच्छूक आहेत. मात्र, महामंडळाचा कारभार बऱ्याच कालावधीनंतर विदर्भाकडे आल्यामुळे यंदाचे संमेलन विदर्भात व्हावे, असाही आग्रह धरला जाऊ शकतो. त्यामुळे यंदाचे संमेलन विदर्भात होणार की मुंबईकडे जाणार, याबाबत उत्सूकता आहे. असे असले तरी निमंत्रणांमधील स्थळांना भेटी दिल्यानंतरच निवड समिती संमेलन स्थळ निश्चित करेल.
संमेलन आयोजित करण्यासाठी निमंत्रण देऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी १५ जुलैपर्यंत आपला प्रस्ताव, महामंडळाचे नागपूर स्थित कार्यालय द्वारा, विदर्भ साहित्य संघ, झांशी राणी चौक, नागपूर - ४४००१२ या पत्त्यावर पोहोचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन कार्यवाह इंद्रजित ओरके यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट