बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पार्किंगमध्ये लावलेल्या एका दुचाकीने सर्वांत प्रथम पेट घेतला. ही आग भडकताच आसपासच्या १० दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आग लागली तेथील खिडकीला लागूनच खोलीत काही मुली अभ्यास करीत होत्या. त्यांना काहीतरी जळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. रात्री तीनच्या सुमारास काही मुलींनी अग्निशमन विभागाला दूरध्वनी करून माहितीही दिली. मात्र, अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल अर्धा तास लागला. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून सक्करदरा येथील अग्निशमन विभागाचे कार्यालय अगदी जवळ आहे. तरीही अग्निशमन विभागाने ही घटना फारशी गांभीर्याने घेतली नाही. आग विझविणारा बंब येईपर्यंत १० दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.
सुरक्षा रक्षक फायर एक्स्टिंग्युशरविषयी अनभिज्ञ
डोळ्यांदेखत दुचाकी आगीत खाक होत असताना काही मुलींनी हिंमत करीत फायर एक्स्टिंग्युशरचे सिलेंडर उचलून आणले. मात्र, वसतिगृहात तैनात सुरक्षा रक्षकाला हे सिलेंडर उघडायचे कसे, हेच माहीत नव्हते. अखेर मुलींनी मुलांच्या वसतिगृहात फोन करून मित्रांना बोलावले. त्यांनी दोन्ही सिलेंडर उघडत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दहा सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा भिंत
मुलींचे वसतिगृह क्रमांक २ मध्ये यापूर्वीही अनेकदा असामाजिक कृत्ये उघडकीस आले आहेत. काही महिन्यांपूर्वी याच वसतिगृह परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. शिवाय वसतिगृहाच्या रस्त्यावर काही मुले छेड काढत असल्याची तक्रारही यापूर्वी अधिष्ठातांनी केली होती. त्यात आता मुलींच्या वसतिगृहात दहा दुचाकी पेटवून देण्यात आल्याने मुलींमध्ये कमालीची दहशत आहे. घडलेली घटना लक्षात घेता, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी तडकाफडकी वसतिगृह क्रमांक १ व २ मध्ये १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले. येत्या २४ तासांत हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. सोबतच वसतिगृहाभोवती तडकाफडकी सुरक्षा भिंतही उभी केली जाणार आहे.
नाशिकचे लोण नागपुरात
पार्किंमध्ये लावलेल्या बाईक्स जाळण्याची पहिली घटना नाशिकमध्ये घडली होती. त्यानंतर हे लोण पुणे, मुंबई नंतर आता नागपुरात आले आहे. मेडिकलमधून त्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने दुचाकी पार्क होत असलेल्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दुचाकींच्या सुरक्षेवरून ही चिंता व्यक्त होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट