पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळ भांडाराला लागलेल्या आगीत शहीद झालेल्या अधिकारी व जवानांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या मुळगावी पाठविण्यात आले. स्फोटात घटनास्थळी शहीद झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथून चारही शहिदांचे पार्थिव सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. नागपुरात आणल्यावर दिल्ली, मुंबईमार्गे त्यांच्या मूळगावी पोहचवण्यात आले. शहीद लेफ्टनंट कर्नल आर. एस. पवार यांचे पार्थिव इंडिगो विमानाने दिल्ली आणि तेथून हरिद्वारला नेण्यात आले. तर, शहीद मेजर के. मनोजकुमार यांचे पार्थिव इंडिगो विमानाने मुंबईला आणि तिथून त्रिवेंद्रमला नेण्यात आले. शहीद नायक रणसिंग आणि शहीद शिपाई सत्यप्रकाश यांचे पार्थिव एअर इंडियाच्या विमानाने हरियाणातील त्यांच्या मुळगावी रेवरीला नेण्यात आले. सत्यप्रकाश यांचे पार्थिव दिल्लीहून विमानाने लखनऊला आणि त्यानंतर कानपूरला नेण्यात आले.
पुलगाव येथील लष्कराच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराला ३० मे रोजी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण आणताना १९ जवान शहीद झाले. त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर सावंगी येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्फोटात घटनास्थळी शहीद झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता नाही, असे संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट