प्रसिद्ध गझल गायक मेहंदी हसन, जगजितसिंग, गुलाम अली, मुबारक बेगम, आशा भोसले, मधुराणी, अशा अनेक गझल गायकांच्या गझलांचा गुलदस्ता कलाकारांनी गुरुवारी सादर केला आणि त्याच्या सूरांचा सुगंध परिसरात पसरला. मैत्री परिवाराच्यावतीने खास गझल प्रेमींसाठी गुरुवारी विष्णुली की रसोई येथे 'गुलदस्ता' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध शेफ व गझलप्रेमी विष्णू मनोहर यांची होती.
कार्यक्रमात गझल गायक प्रसन्न जोशी, श्रुती चौधरी व सोनाली फणसाळकर यांनी एकाहून एक सरस गझल सादर केल्या. त्यात 'सलोना सा सजन हैं...', 'आज जाने की जिद ना करो...', 'चराग सा जला गया...', 'तुम अपना रंजो गम...', 'रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...', 'गझले उल्फत को निभाये तो निभाये कैसे...', 'तुमको देखा तो ये खयाला आया...' अशी सुमधूर गझलांची मेजवानी रसिकांनी यावेळी अनुभवली. कलाकारांना किबोर्डवर संदीप झाडे, व्हायोलिनवर निशिकांत भालेराव, गिटारवर अर्पित श्रीरंग, तबल्यावर प्रमोद बावणे, हार्मोनियमवर राहुल मानेकर व बासरीवर अरविंद उपाध्ये यांनी उत्तम साथसंगत केली. सूत्रसंचालन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले. कार्यक्रम तब्बल चाळीस मिनिटे उशीरा सुरू झाला. सायंकाळी साडेसहा वाजतापासून रसिकांनी कार्यक्रमाला गर्दी करायला सुरूवात केली. परंतु, गायक व वादक नेहमीप्रमाणे उशिरा कार्यक्रमस्थळी पोहोचल्यामुळे रसिकांना त्यांची बरीच वाट बघावी लागली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट