पाणी टंचाई, बोअरवेल खोदकाम आणि ग्रामसेवकांच्या समुपदेशनातील अयोग्य प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शुक्रवार, ३ जून रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत गाजण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची ही दुसरी सभा आहे. पहिल्या सभेत पाण्याचा मुद्दा चांगलाच पेटला होता. त्यामुळे डॉ. बलकवडे पाण्याची कामे न विलंबाने करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे बोअरवेलमुळे सत्तापक्ष अडचणीत आला आहे. मात्र, याचा लाभ विरोधी पक्ष घेऊ शकलेला नाही. त्यामुळे सत्तापक्षाने कसेबसे हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी बोअरवेलचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे पुन्हा पाठविल्याने जिल्हा परिषदेची पंचाईत झाली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना सीईओंना दिले.
जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर एकीकडे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे बोलत आहे. मात्र, प्रत्यक्षात काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अध्यक्ष करीत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. बोअरवेलच्या वादावर पडदा टाकण्यासाठी ग्रामपंचायतींकडे कारभार देण्यात येणार आहे. पण, काही कंत्राटदारांनी अध्यक्षांना पत्र पाठवून बोअरवेलचे काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितल्याने सत्तापक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर, कुही तालुक्यातील ग्रामसेवकांच्या समुपदेशन प्रक्रिया अयोग्य पध्दतीने झाल्याचा आरोप केला जात आहे. यावरही सभेच चर्चा होण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट