नागपूर ः डब्बा ट्रेडिंगमध्ये सक्रिय असलेला सट्टाकिंग नरेश व दिनेश भुतडा बंधू अद्यापही फरार असून, दोघेही आंध्रातील देवाच्या शरणात गेल्याची माहिती समोर आली आहे. अकोला पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर असून, लवरकच दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने बुधवारी रात्री अकोटमधील लोहारी रोडवरील भुतडा बधूंच्या कस्तुरी कमोडिटिजवर छापा टाकून डब्बा ट्रेडिंग उघडकीस आणली होती. पोलिसांनी दीपक महादेव राऊत, प्रशांत लाडोळे, संतोष भारसाकळे, रवींद्र भेंडारकर, गजानन मुराळे, राष्ट्रपाल भिसे, राजेश चंदन, संदीप वर्मा व रमाकांत मिश्रा यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून सौदा सॉफ्टवेअर, लॅपटॉप, पीसी कम्प्युटर, वायफाय मोडेम, १५ मोबाइल, असे एक लाखाचे साहित्य जप्त केले.
अटकेतील आरोपींना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांची ६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, वऱ्हाडात चालणारी डब्बा ट्रेडिंग ही इंदूरमधून संचालित होत असून, येथूनच सौदा सॉफ्टवेअरचे वितरण करण्यात येते. इंदूरमधील एक बडा व्यापारी या डब्बा ट्रेडिंगचा बादशाह असल्याचेही सांगण्यात येते. सॉफ्टवेअरची तपासणी सुरू असून यात अनेकांची नावे समोर आली आहेत. लवकरच त्यांची धरपकड सुरू करण्यात येईल, असे अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
डब्ब्याच्या पैशातून चित्रपट निर्मिती
नरेश भुतडा याने गतवर्षी एका धार्मिक चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्यांची भूमिका होती. या चित्रपटाच्या 'प्रमोशन'वर नरेश भुतडा याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला होता.
नागपुरातील व्यापारीही रडारवर
सॉफ्टवेअरची तपासणी सुरू आहे. अकोल्यासह अमरावती व नागपुरातील काही व्यापाऱ्यांची शेकडो नावे यात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे व्यापारीही अकोला पोलिसांच्या रडारवर आले असून, लवकरच अकोला पोलिस नागपुरातही छापे टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट