अस्तंगत होण्याच्या मार्गावर असलेल्या युरेशियन उदबिलाव या सस्तन प्राण्याचे अस्तित्व मध्य भारतात असल्याची महत्त्वपूर्ण नोंद नुकतीच घेण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि कान्हा-पेंच कॉरिडॉरच्या प्रदेशात हा दुर्मिळ प्राणी आढळून आला आहे.
मध्यप्रदेश वन विभाग आणि वाइल्डलाइफ काँझर्व्हेशन ट्रस्ट यांच्या वतीने मध्य भारतातील या प्रदेशात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरू आहे. सुमारे ५८०० किलोमीटरच्या परिसरात हे कॅमेरा ट्रॅपिंग सुरू आहे. या कॅमेरा ट्रॅप दरम्यान युरेशियन उदबिलावचे अस्तित्व आढळून आले. युरोप, आफ्रिका आणि आशियाच्या तुरळक भागांमध्ये आढळणाऱ्या प्रजातीला आययसीएन रेड लिस्टनुसार अस्तंगत होण्याच्या मार्गावरील असलेली प्रजाती म्हणून घोषित केले आहे. युरोप वगळता या प्रजातीशी संबंधित कोणतीही आकडेवारी एकत्रित स्वरूपात जगात उपलब्ध नाही.
या आधीच्या महितीनुसार, हिमालय तसेच पश्चिम घाटांमध्ये युरेशियन ऑटरचे अस्तित्व होते. मात्र, त्याबाबतचे कोणतेही प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नव्हते. मध्य भारतात तर या प्रजातीचे अस्तित्व कधीही नोंदविले गेले नव्हते. कॅमेरा ट्रॅपच्या पुराव्यांनुसार आता मध्य भारतात या दुर्मिळ प्रजातीचे अस्तित्व असल्याचे आढळून आले आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पातून गेल्या चार वर्षात ३५ गावांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे, वन्यप्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या सलग भूभाग उपलब्ध झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून विविध वन्य प्रजातींचे अधिवास या भौगोलिक क्षेत्रात तयार होत आहे. युरेशियन ऑटरच्या अस्तित्वामुळे त्याला बळकटी मिळाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट