आजकाल सर्वत्र संस्कारांबद्दल खूप बोलले जाते. परंतु संस्कार हे कुणी सांगून होत नसतात, तर स्वतःच्या वर्तनातून ते दाखवून द्यावे लागतात. बाबांच्या संस्कारामुळेच आम्ही घडत गेलो, अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास व डॉ. प्रकाश आमटे यांनी बाबांच्या आठवणी जागवल्या. शिस्तबद्ध प्रत्येक कामाचे बाबांनी कौतुक केले. आज अशा प्रत्येक कामांमध्ये बाबा दिसतात. ते आहेतच, त्यामुळेच त्यांची पोकळी जाणवत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
'फादर्स डे'निमित्त आमटे बंधूंनी 'मटा'शी संवाद साधला. डॉ. प्रकाश म्हणाले, बाबांनी कुष्ठरुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा समाजातून त्यांना विरोध झाला. परंतु त्या विरोधाला न जुमानता बाबांनी आपले कार्य नेटाने सुरू ठेवले. आज बाबा नसतानाही त्यांच्या प्रेरणेने कामाचा तोच जोम कायम आहे. काम कुठेही कमी झालेले नाही. उलट ते वाढतच आहे. बाबांच्या काम करण्याच्या पद्धतीतून अनेक तरुणांनी प्रेरणा घेतली. संस्था म्हणण्यापेक्षा मोठे कुटुंबच चालविले. बाबांनी उभ्या केलेल्या कार्यात बदल झाला आहे. नवीन पिढी आपल्या पद्धतीने काम करत आहे. आम्हीदेखील जवळ-जवळ निवृत्ती स्वीकारली आहे. अनेक तरुण साधनाताईंना आई तर बाबांना वडील मानत असत, असेही त्यांनी सांगितले. आनंदवन बाबांनी स्थापन केले. पण ते त्यांना व्यक्तिसापेक्ष करायचे नव्हते. त्यामुळे त्यांना पुरस्कार व स्वत:चे छायाचित्र नजरेसमोर नको होते. आपले काम हे शेवटच्या घटकापर्यंत पोहचावे, यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. बाबांनी केलेले काम पुढे नेण्याचे काम 'आनंदवना'त सुरू आहे, असे डॉ. विकास यांनी सांगितले. आहे त्या परिस्थितीशी तोंड देत जीवन जगणे हा बाबांचा संस्कार आमच्यावर झाला आहे. त्यामुळे गरजा कमी करून आम्ही इतरांसारखेच जीवन जगतो. त्या माध्यमातून लोकसेवा, रुग्णसेवा, शिक्षण, मोफत औषधोपचार, जनजागृती हे प्रकार सुरू आहेत. नागरिकांना जेव्हा आम्ही काय करतो हे पाहण्याची गरज वाटू लागली त्या वेळी त्यांची मने कळवळली. त्या माध्यमातून प्रकल्पासाठी देणग्या मिळू लागल्या. त्या माध्यमातून हेमलकसा येथे विकासाची कामे करणे शक्य झाले, असेही डॉ. आमटे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट