शेतकऱ्यांना अनुदानावर महाबीजचे धान बियाणे पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र त्यात कचरा, कोंडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार सालेकसा आणि गोरेगाव पंचायत समितीमध्ये आढळला आहे.
हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खताची खरेदी सुरू करण्यात आली आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ६८ क्विंटल धानाचे बियाणे मागितले होते. पण, त्यात कचराच अधिक आढळल्याने रोष व्यक्त होत आहे. पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे आणि गोरेगाव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी यांनी संताप व्यक्त केला आहे. शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांची भेट घेऊन महाबीजने पुरवठा केलेले निकृष्ट बियाण्यांचे बॅग त्यांना निवेदनासोबत दिले. निकृष्ट बियाण्यांना त्वरित परत घेण्यासंबधी मेंढे यांनी कृषी विभागाला निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट बियाणे पुरविले जाणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना देत कारवाईचे आश्वासन दिले. कृषी विभागाशी संपर्क साधला असता हो शकला नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट