विशेष शिक्षकांचे समायोजन केले जावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी सोमवारी मुंडण करून घेत शासनाचा निषेध केला. नागपुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हे मुंडण आंदोलन केले.
शिक्षक आमदार नागो गाणार हेदेखील आज या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्यासमक्ष हे मुंडण आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेंतर्गत अपंग समावेशित शिक्षण योजना विशेष कृती समितीच्य वतीने नागपूर, मुंबई आणि अमरावती येथे १५ जूनपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेशी संबंधित असलेल्या अपंग समावेशित शिक्षण योजना विशेष कृती समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री तावडे यांनी विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी २०१६ पर्यंत हे समायोजन करण्यात येईल, असेही त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात आजवर राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
मागील तीन ते चार वर्षांचे थकीत वेतनदेखील या शिक्षकांना मिळालेले नाही. त्यामुळे, समायोजन झाले पाहिजे व थकित वेतन मिळालेच पाहिजे, या मागण्यांसाठी कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. नागपूरसह अमरावती आणि मुंबई येथेदेखील हे आंदोलन करण्यात येत आहे.
आमदारांना आठवण आश्वासनांची! भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील आमदारांनी विशेष शिक्षकांना समायोजनाच्या प्रश्नावर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वासनांची आठवण आंदोलक शिक्षकांनी सोमवारी करून दिली. विशेष शिक्षकांचे एक शिष्टमंडळ आ. गाणार यांच्यासह रामटेक येथे पोहोचले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. आंदोलक शिक्षक मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट