मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सूर्याने चटके देण्याचे खाते उघडल्याने (४५.३ अंश सेल्सिअस) या महिन्यात उन्हाची काहिली कशी राहणार याची चिंता नागपुरकरांना भेडसावत होती. परंतु, गुरुवारी वरुणदेवाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावल्याने वातावरणात अचानक थंडावा आला. गुरुवारी काही काळाकरिता बसरलेल्या जोरदार सरींनी शहराचे तापमान कमी होऊन ४०.४ अंशावर आले.
विदर्भासह संपूर्ण मध्य भारतात मागील आठवडाभरापासून पाऱ्यात मोठी वाढ झाली होती. एप्रिलअखेर आणि मे महिन्याचा पहिला आठवडा दरवर्षीच तापत असतो. तसा तो यंदादेखील तापून पारा ४५ अंशांच्यावर व सरासरीपेक्षा तीन ते चार अंश अधिक होता. मात्र, उष्णतेत अचानक वाढ झाल्याने आर्द्रतादेखील निर्माण झाली. परिणामी सोमवारपासून ढगाळ असलेल्या वातावरणाचा प्रभाव बुधवारी अधिक दिसला. दरम्यान, शहरात बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवला. परंतु, गुरुवारी दुपारी ४ वाजतानंतर अचानक वातावरण बदलले. सायंकाळी ५ वाजतापर्यंत शहरात अनेक ठिकाणी काळोख दाटून आला होता. यातून काही भागात जोरदार, तर काही भागात हलक्या पावसाची सर कोसळली.
वादळीवारे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. विदर्भ, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक आणि अंतर्गत तामीळनाडू या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारावरून येत असलेले वारे या भागात धडकत असल्याने तसे होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवसांकरिता कायम राहणार आहे. त्यानंतर तापमानात परत एकदा वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभलाही वादळाचा फटका मध्यप्रदेशातील उजैन शहरात २२ एप्रिलपासून सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याला गुरुवारी वादळाचा चांगलाच फटका बसला. जोरदार वादळामुळे विविध कार्यक्रमांसाठी उभारलेले गेलेले पेंडॉल तसेच, झोपड्या वादळामुळे उडून गेले. नागपूर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडे सिंहस्थ कुंभमध्ये कला महोत्सवाचे आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली. नागपूरसह देशभरातील ३०० कलाकार कुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजन व सादरीकरणात गुंतलेले होते. प्रचंड वादळाचा फटका या सर्व कलाकारांनाही बसला आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार सध्या उजैन येथेच असून त्यांनी दक्षिण मध्य केंद्राचे जनसंपर्क अधिकारी गणेश थोरात यांच्याशी संपर्क साधून तातडीने कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. त्याकरीता गणेश थोरात उज्जैनकडे रवाना झाले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट