नाग, पिवळी आणि पोरा या नद्यांच्या स्वच्छतेची घोषणा म्हणजे मनपाकरिता एक प्रकारचे वार्षिक उपक्रमच आहे. या नद्यांवर चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. परंतु, गेल्या चार वर्षांपासून त्यातील एकही प्रक्रिया प्रकल्प अद्याप अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे या नद्यांवरील छोट्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे.
'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'ने सुरू केलेल्या नाग नदी अभियानानंतर मनपाने नाग आणि पिवळी नदी स्वच्छतेचे अभियान हाती घेतले. यात नद्यांमधील गाळ, काठावरील कचरा आणि झुडपे स्वच्छ करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात या नद्या स्वच्छ झाल्या होत्या. परंतु, या नद्यांचे पुनरुज्जीवीकरण यामुळे साध्य होऊ शकले नाही. या नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे यात अडसर निर्माण होत आहे. मनपाने दररोज ५ हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारे छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प या नद्यांवर तयार करण्याचे निश्चित केले होते. नाग नदीकरिता शंकरनगर, मोक्षधाम आणि रेशीमबाग येथे, तर पिवळी नदीकरिता मानकापूर हे ठिकाण ठरविण्यात आले होते. २०१२पर्यंत या प्रकल्पांना मान्यता मिळणे अपेक्षित होते. त्याकरिता एका खासगी कंपनीची नियुक्तीही करण्यात येणार होती. या प्रकल्पांचा अंदाजे खर्च सव्वाचार कोटी रुपये इतका होता. यातील शंकरनगर आणि रेशीमबाग येथील प्रकल्प सुरु होणार नसून तो जवळपास रद्दबातल ठरविण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका मनपा अधिकाऱ्याने 'मटा'ला दिली. या प्रकल्पाकरिता उशिर लागल्याने या प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे खासगी कंपनीने त्याकरिता नकार दिला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नागरिकांनो, तुम्ही घ्या पुढाकार! नाग नदीच्या विकासासाठी आता जनरेटा वाढतो आहे. 'मटा'ने मध्यंतरी दिलेल्या हाकेला नागरीक तसेच मनपाने सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी नाग नदीने मोकळा श्वास घेतला होता. आता पुन्हा जनरेटा अधिक वाढण्याची गरज आहे. तेव्हा नागपूरकरांनो, नाग नदी स्वच्छ होण्यासाठी महापालिकेला बाध्य करणे ही तुमचीही जबाबदारी आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट