Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

गांधी दरबारी पालिकेच्या तक्रारी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना भाजपमुक्त महापालिकेचा निर्धार करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी गांधीच्या दरबारात ठाकरे यांनी महापालिकेतील तक्रारींचा पाढाच वाचला. इतकेच नव्हे तर येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला बळ देण्यासाठी हायकमांडने प्रयत्न करावेत, अशी विनंती राहुल गांधींना केली.

या भेटीदरम्यान ठाकरे यांनी शहरातील राजकीय परिस्थिती, काँग्रेसची पक्षबांधणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांना दिली. यावेळी महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. तर ठाकरे ययांच्यासोबत नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, उमाकांत अग्नीहोत्री, दीपक वानखेडे आदी उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, या काळात शहराचा विकास खुंटला असून शहराचा विकास करण्यासाठी भाजपला सत्तेतून घालवणे अत्यंत आवश्यक असल्याचे ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे 'हेवीवेट' नेते शहरातूनच असले, तरी काँग्रेसने ताकदीने संघटनेची बांधणी केली आहे. गटातटाचे राजकारण बाजुला सारून नेते व कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले आहेत. नागपूर शहरात १८०० बूथ आहेत. लवकरच प्रत्येक बूथवर १० सक्रीय सदस्य नियुक्त केले जातील. त्यामुळे शहरात एकाचवेळी १८ हजार बूथ कार्यकर्ते उपलब्ध होतील. या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भरवशावर नागपुरात काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हायकमांडकडून या कामासाठी शहर काँग्रेसला ताकद मिळावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना केली.

नागपूर महापालिकेत भाजपने मोठ्या प्रमाणात सत्तेचा दुरुपयोग केला आहे. ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून नागपुरातील जनतेला पिण्याच्या पाण्याचे भरमसाठ बील पाठविले जात आहे. नागरिकांची लूट सुरू आहे. वारंवार मालमत्ता करात वाढ करून जनतेवर बोझा लादला जात आहे. शाहर काँग्रेसने या विरोधात सातत्याने आवाज उठवित आंदोलने केली आहेत. भाजपच्या भ्रष्टाचारी धोरणांपासून आता जनताही सावध होत आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>