देशातील अनेक शहरांमध्ये ऑटोरिक्षा मीटरनुसार चालतात. मात्र, नागपुरातील रिक्षाचालकांना मीटरनुसार ऑटोचालविण्याची सवय लावण्यात प्रशासनाला अपयश आले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि फसवणूक होऊ नये म्हणून मीटरनुसार ऑटोरिक्षा चालविणे आवश्यक असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी व्यक्त केले. ऑटो मीटरने चालविण्याच्या अटीवर ऑटोचालक व ऑटोसंघटनांचे पदाधिकारी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विभागीय परिवहन प्राधिकरणाकडून दर ठरवून घेतात. ग्राहक संघटनांना विश्वासात न घेता दर आकारण्यात येत असल्याची खंतही संघटनेने व्यक्त केली. जिल्हाधिकारी सचिव कुर्वे यांनी २७ जूनपासून ऑटोरिक्षा मीटरने चालविण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे.
पहिल्या किमीला हवे ११ रुपये
२०१४ मध्ये प्रत्येक किलोमिटरला १४ रुपये दर ठरवून देण्यात आले होते. त्यावेळी पेट्रोलचे दर अधिक होते. त्यापूर्वी पहिल्या किमीला ११ रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किमीला ९ रुपये ठरविण्यात आले होते. न्या. हकीम समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली असती तर ऑटोरिक्षाचे दर १४ रुपयांऐवजी ११ रुपये असते. ऑटो मीटरने चालविण्याचा आग्रह धरण्यात यावा. किमान महिनाभर ऑटो मीटरने चालविण्याची कारवाई करण्याची मोहीम राबविण्याची मागणी ग्राहक संघटनेचे संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, विनोद देशमुख, अॅड. स्मिता देशपांडे, घनश्याम राहाटे आदींनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट