महाराष्ट्र आणि तेलंगणच्या संयुक्त कारवाईत तीन माओवाद्यांना कंठस्नान घातल्यावरून हादरलेल्या माओवाद्यांनी रविवारी दंडकारण्यात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एटापल्ली तालुक्यात हेडरीच्या जंगलात चकमक उडाली तर छत्तीसगडमध्ये पोलिस ठाण्यावर गोळीबार करण्यात आला. यात दोन जवान जखमी झाले आहेत. याबरोबरच तेलंगण-छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांनी टिफीन बॉम्बचा स्फोट घडवून आणला.
कचलेरच्या जंगलात शनिवारी चकमक उडाल्यानंतर पोलिस आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती. यातच हेडरीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलानेही गोळीबार केला. यात एका जवानाच्या गालाला गोळी स्पर्शून गेली. ताे जखमी झाला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवादी पसार झाले. जखमी जवानाला हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोलीत आणून उपचार करण्यात आले. या घटनेनंतर कोम्बिंग ऑपरेशन सुरूच असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.
गडचिरोली आणि तेलंगण पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवित अहेरी तालुक्यातील व्येंकटापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. याच्या निषेधार्थ माओवाद्यांनी तेलंगणसह दंडकारण्य बंदचे आवाहन केले होते. त्या अंतर्गत तेलंगण-छत्तीसगड सीमेवर टिफीन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. चकमकीचा निषेध करणारी पत्रकेही टाकली. ही चकमक खोटी असल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गादिरस पोलिस ठाण्यावर माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास साध्या वेशात आलेल्या पाच ते सहा माओवाद्यांनी हा गोळीबार केला. गोळीबारात गेटच्या मोर्चावर तैनात असलेल्या जवानाच्या हात आणि पोटाला गोळ्या लागल्या. दरम्यान, आठवडी बाजार असल्याने गर्दीचा फायदा घेऊन माओवादी पसार झाले. जखमी पोलिसाला सुकमाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट