सर्वसामान्यांची गाडी जेव्हा सुरू होत नाही, तेव्हा तिला धक्का द्यावा लागतो. ते चित्र थोडेसे विचित्र असले तरी त्याचा 'लोड' कुणी घेत नाही. परंतु, जेव्हा राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांची गाडी अचानक खराब होते आणि पोलिसांसह जवानांना लालदिव्याच्या गाडीला धक्के मारावे लागतात तेव्हा अनेकांना धक्के बसतात. असेच धक्के सोमवारी विमानतळावर सामान्यांना बसले.
मुख्यमंत्री फडणवीस तीन तासांच्या दौऱ्यावर सोमवारी सायंकाळी नागपुरात आले. सुरक्षा दर्जानुसार त्यांची कार आणि ताफा विमानतळावर सज्ज ठेवण्यात आला. मुख्यमंत्री बाहेर येण्याच्या दहा-बारा मिनिटे आधी चालकाने कार सुरू करण्याचे प्रयत्न केले. पण, काही केल्या कार सुरू होत नव्हती. ते बघून विमानतळावरील वातावरण बदलू लागले. अखेर सुरक्षा जवान आणि इतरांनी कारला धक्का दिला. मागे-पुढे कार चालवण्यात आली. यानंतरही कार सुरू होतच नव्हती. त्यामुळे धाकधूक वाढली. सुमारे १० ते १५ मिनिटे कार सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांसाठी दुसऱ्या वाहनाबाबत तातडीने चर्चा झाली पण, दुसरे वाहन लहान असल्याने सुरक्षा यंत्रणेवर परत संकट ओढवले. दरम्यान, आमदार समीर मेघे यावेळी तेथेच होते.
मुख्यमंत्री फडणवीस बाहेर आल्यानंतर त्यांना कार नादुरुस्त असल्याची कल्पना देण्यात आली. या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री लगेच समीर मेघे यांच्या कारमध्ये बसून हिंगण्याकडे रवाना झाले, तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तांत्रिक अडचणी आहेत. यापूर्वीही कारबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. बुलेट प्रूफ कार असल्याने ती पोलिसांच्या ताब्यात असते. पोलिसांची वाहन शाखा आहे. त्यांच्याकडून झालेल्या या निष्काळजीपणाबद्दल वरिष्ठ पोलिसांनीच नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांसारख्या राज्य प्रमुखांची कार अशी ऐनवेळी खराब होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा लक्षात घेता सरकारने देखील फॉर्च्युनरसारखी मोठी एसयूव्ही खरेदी करावी, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुचवले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट