नागपूर : अर्थिक डबघाईस आलेली मनपा आता उत्पन्नाचे नवनवे स्रोत शोधत आहे. आता स्थायी समितीने शहरातील अनेक मोक्याच्या मोकळ्या छोट्या जागा शोधून त्या एटीएमसाठी भाड्याने देण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्थावर विभागाला अशा जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहरात अनेक ठिकाणी मनपाच्या मालकीच्या मोकळ्या जागा आहेत. खासगी व्यक्तींना एटीएमसाठी आधी कर द्यावा लागतो. त्यामुळे त्यांना दिलेल्या भाड्याच्या अर्धी रक्कम मनपाला द्यावी लागते. मनपाने हेच हेरून त्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. यानुसार शहरातील अनेक भागांत १० बाय १०, १० बाय १५ वा १० बाय २०च्या मोकळ्या जागा आहेत. अशा अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे, वा त्या मोकळ्या पडून आहेत. अशा जागा एटीएमसाठी दिल्यास त्याचे उत्पन्न मनपाला मिळू शकते. मनपाची जागा असल्याने कर द्यावा लागणार नाही. शिवाय, भाड्याची रक्क्मही तिजोरीत जमा होईल. एका एटीएमसाठी साधारणत: ४० ते ५० हजार भाडे मिळते. हा सर्व पैसा मनपाला मिळेल. यामुळे मनपाच्या उत्पन्नातही भर पडेल. आज शहरात असलेल्या अनेक बँकांना त्यांच्या एटीएमसाठी मोक्याची जागा मिळत नाही. मिळालीच तर जागामालक जादाचे भाडे व अटी लादतात. परिणामी, एटीएम काही वर्षांच्या करारानंतर बंद होतात. आजही अनेक बँका एटीएमसाठी जागा शोधत आहेत. अशा बँकांपर्यंत पोहोचून त्यांना मनपाच्या मोक्याच्या जागा भाड्याने घेण्यासाठीचा प्रस्ताव दिला जाईल. शहरात आजही अनेक ठिकाणी एटीएमची शोधाशोध करावी लागते. शहरातील चहुभागांत अनेक मोक्याच्या ठिकाणी मनपाच्या मालकीच्या मोकळ्या जागा आहेत. केवळ त्या शोधण्याची गरज आहे. अशा जागा शोधून त्या एटीएमसाठी भाड्याने दिल्यास मनपाच्या तिजोरीलाही वजन येईल, असे बोलले जात आहे. स्थायी समिती सभापती बंडू राऊत यांची ही कल्पना आहे. आता त्याला किती मूर्तरूप मिळेल, हे येणारा काळच सांगेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट