टीम मटा, नागपूर
तू शाळेत आलीस.. तुला काय व्हायचे आहे. तुझ्या शाळेत पाण्याची व्यवस्था आहे काय... शौचालय आहे काय... शाळेत काय हवे आहे. शाळा कशी वाटते.. अशी एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना खुद्द राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विचारली. या प्रश्नांमधून थेट विद्यार्थ्यांकडूनच राज्यातील शाळांच्या व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. निमित्त होते शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त; सोमवारी आयोजित विद्यार्थी संवादाचे.
तावडे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बुलडाणा, अमरावती व गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही प्रश्नांना उत्तम प्रतिसाद दिला. या व्हिडिओ कॉन्फरंसिंगला मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, संचालक नांदेडे उपस्थित होते. तर बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात वरखेड व सोयगावच्या विद्यार्थ्यांसह अधिकारी उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरसिंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा या विद्यार्थ्यांनाही पहिलाच परिचय झाला. त्यामुळे साहजिकच विद्यार्थीही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत होते. टीव्हीसारखे दिसणाऱ्या वस्तूसमोर बसून बोलायचे असे विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. शिक्षणमंत्र्यांनीच स्वागत करून आस्थेने विचारपूस केल्यानंतर विद्यार्थी बोलके झाले. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यात पहिली ते चवथीचे सामान्य ज्ञान, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता गृह, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पटसंख्या, शिक्षकांची शिकविण्याची पद्धत, माध्यान्ह भोजन, शाळा का आवडते, शाळेचे गुरुजी तुम्हाला आवडतात का, अशा अनेकानेक प्रश्नांचा यात अंतर्भाव होता.
गोंडी आणि कोरकू भाषेतही संवाद
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील कोरकू तर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी गोंडी भाषेत संवाद साधला. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनीही संवाद साधला. आदिवासी व माओवादग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथील ही जिल्हा परिषद शाळा संपूर्ण डिजिटल आहे. त्यामुळे आज झालेल्या कार्यक्रमासाठी या शाळेची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट