सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या अगदी समोरच्या उड्डाणपुलाखालचा हा प्रसंग. तेथे देखाव्याच्या दगडांसोबतच असा संसार थाटलेला दिसतो. हा संसारही अनेकदा बदललेला दिसतो. चार दिवसानंतर गेलात तर वेगळंच कुटुंब. त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केलात, तर त्यांच्या तोंडून फारसं काही निघतंच नाही...खोदून विचारा किंवा प्रेमानं. 'आप को क्या करना हैं', असं त्यांचं शेवटचं वाक्य.
शहरातील जवळपास सर्वच पुलांखाली असे संसार दिसतील. काही ठिकाणी कुटुंब असतं, तर अनेक ठिकाणी गटागटाने वा एकटे राहणारे लोकं दिसतात...तेही अगदी हक्कानं वास्तव्य करणारे. पंचशील चौकाकडे जाणाऱ्या पुलाखाली असेच चौघेजण दिसले. नुकतंच जेवण आटोपलं होतं त्यांचं. त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्याच प्रश्नार्थक आणि रोखलेल्या नजरा. 'मजदूर हैं भाई', यापलीकडे ते काहीच बोलले नाहीत. पुलाखालचा पूर्णच भाग झोपलेल्या माणसांनी व्यापलेला. त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रश्नच नव्हता.
तेथून पुढे छत्रपती चौकातल्या पुलाखाली डोक्याला शेला बांधलेला, दाढी वाढवलेला एक ज्येष्ठ दिसला. बंडलात विड्या बरोबर आहेत की नाही, यात्री खात्री करून घेत होता. 'काय बाबा, कुठून आले', असं विचारल्यावर त्यानं विडी काढली, ती शिलगावून आधी शांतपणे एक झुरका घेतला अन् नुसता पाहात राहिला. त्याच्या आणखी जवळ गेल्यावर जरा सावरून बसला. पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा डावा हात उंचावून फक्त वर्धा रोडकडे दाखविला. 'घरी नाही जायचं का', असं विचारल्यावर म्हणाला, 'कायचं घर बाबू. हेच घर आहे आपलं.' चार-पाच झुरके मारल्यानंतर त्यानं विडी जमिनीवर दाबून विझवली. एक कापड टाकून उशाखाली थैली घेतली अन् झोपण्याची तयारी करू लागला. 'पण, आले कुठून', असं विचारताच म्हणाला, 'का करा लागते बे तुले?'
सकाळी रॅडिसन चौकातून नरेंद्रनगरकडे जाणाऱ्या पुलाखालचं बिऱ्हाड गाठलं. माणसं चुळा भरत होते, बायका विटांच्या चुलीवर चहा बनवीत होत्या. चिल्लेपिल्ले खेळत होते. बाजूला फळ्यांचं साहित्य पडलेलं. त्यांनाही विचारलं. ते बऱ्यापैकी बोलले. मध्य प्रदेशातल्या मागास भागातून आलेलं हे कुटुंब 'फळे' अर्थात झाडू बनविण्याचं काम करतात. यासाठीचं साहित्य स्वस्तात विकत आणायचं, झाडू बनवायचे अन् ते डोक्यावर घेऊन गल्लोगल्ली विकायचे. कधीकधी कुणीतरी दुकानदार येतो, अधिकची ऑर्डर देऊन जातो. पुलाच्या छतात दिवसभर काम अन् सायंकाळी आराम असा त्यांचा दिनक्रम आहे. संसारासाठी लागणारं साहित्य ते काय, तर आठ-दहा बोचकी. त्यात भांडी, कपडे, थोडंसं धान्य अन् चुलीसाठी विटा.
अगदी अशीच स्थिती मंगळवारी, जुनी मंगळवारी, दिघोरी, सक्करदरा अशा सर्वच उड्डाणपुलांखाली दिसली. कुटुंबे किंवा गट किंवा काही एकटे-दुकटे अशा सर्वांसाठी उड्डाणपुलाखालची जागा म्हणजे हक्काची झाली आहे. जणू, नागपुरात कुणी उघड्यावर राहू शकत नाही. सर्वांना येथे छत मिळेल, याची गॅरण्टी! (पूर्वार्ध)
(उद्याच्या अंकात... सगळं जमतं, 'जमवावं' लागतं!)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट