म. टा. प्रतिनिधी, नागपूर
शाळेच्या पहिल्या दिवशी, सोमवारी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सीताबर्डी येथील पटवर्धन शाळेला भेट दिली. शासकीय शाळांमधून उच्चदर्जाचे शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात ई-लर्निंग सुरू करण्यात येईल. यासोबत विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचीही शासनाची योजना आहे, असे बावनकुळे यांनी या भेटीदरम्यान सांगितले.
सीताबर्डी येथील पटवर्धन विद्यालयात आजपासून शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवेशोत्सव समारंभ आयोजित केला होता, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सतीश मेंढे, मुख्याध्यापिका सुधा वासनिक व अन्य शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. जिल्हयातील दुर्गम भागातील १२४ गावांत बससुविधा नाही. त्या गावांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाणही वाढते.
याचा विचार करुन एस.टी. महामंडळाच्या सोबत चर्चा करण्यात येईल, असेही बावनकुळे म्हणाले.
वीज बील न भरल्यामुळे शाळांमधील विद्युतपुरवठा खंडित होतो. यासंदर्भात वेळोवेळी विजेची देयके भरण्याबाबत जिल्हा परिषदेला सूचना देण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी यावेळी वृक्षारोपण तसेच पुस्तक वाटप केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट