सावली सगळ्यांनाच हवी असते. मात्र, झाड लावण्याची तयारी कुणाचीच नसते. झाडे संपतात, पाणी संपते आणि दुष्काळाचे राज्य येते. ते येऊ नये म्हणून झाडे लावा, नागपूरला हिरवेगार करा, असे आवाहन स्वयंसेवी संस्थांच्यावतीने नागपूरकरांना करण्यात आले.
महानगरपालिका, महाराष्ट्र टाइम्स आणि वनराईच्या संयुक्त विद्यमाने 'एक व्यक्ती एक झाड' योजना राबविण्यात येत आहे. त्या संदर्भातील एक बैठक महापालिकेत महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जैवविविधता समिती सभापती दिव्या धुरडे, क्रीडा समिती सभापती हरीश दिकोंडवार, शिक्षण समिती सभापती गोपाल बोहरे, वनराईचे कार्याध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, सचिव अजय पाटील, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, शहर संपादक अतुल पांडे, मैत्री परिवारचे चंदू पेंडके, सुहास खरे, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, एचडीएफसीचे मनीष वारके, चंद्रमौली भारद्वाज, कामयाब फाउंडेशनचे हितेश डोर्लीकर, सीए इन्स्टिटयुटचे स्वप्नील घाटे, सुरेंद्र दुरूगकर, सृष्टीचे एस. आर. पागे, लायन्स क्लबचे राजेश अडीचा, ग्राहक न्याय परिषदेचे अमित हेडा, नेचर अॅण्ड कल्चर असोसिएशनचे आनंद कोटेवार यांच्यासह मनपाचे अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्दिकी प्रामुख्याने उपस्थित होते. उद्यान अधीक्षक सुधीर माटे यांनी अभियानाची माहिती दिली. यंदा किमान ५० हजार झाडे लावण्याचे लक्ष्य आहे. १ जुलैला पहिल्या दिवशी १० हजार लावण्यात येतील. दहाही झोनमध्ये स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात येतील. झोनमधील मोकळया जागा शोधून तेथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. जैवविविधता समिती सभापती दिव्या धुरडे यांनी विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, याकडे लक्ष वेधले.
सहा हजार झाडांशी मैत्री मैत्री परिवारातर्फे ६००० झाडे लावण्यात येणार आहे. ही सर्व झाडे जगविण्याचा निर्धारही करण्यात आला. यासाठी शहरातील २२ शाळांची मदत घेतली जाणार आहे. पोलिस आयुक्तालयातही वृक्षारोपण करण्यात येईल. महिन्याभरात ५००० हजार व्यक्तींना या झाडाचे पालकत्व देण्याची परिवाराची योजना असल्याचे चंदू पेंडके यांनी सांगितले.
वृक्षमित्र योजना राबवा ग्राहक न्याय परिषदेने वृक्षरोपणासाठी पुढाकार घेत अंबाझरीजवळील मोकळया जागेत तसेच वाडीजवळी आरपीएफ जागेवर मोठया संख्येत वृक्षारोपण करण्याचे ठरविले असल्याचे परीषदेचे जिल्हा सचिव अमित हेडा यांनी सांगितले. हेडा यांनी मनपाला पोलिस मित्रांप्रमाणे वृक्षमित्र योजना राबविण्याची सूचना केली.
एचडीएफसीचे टार्गेट १००१ एचडीएफसीच्या ७० शाखेतील कर्मचारी १००१ वृक्ष लावणार आहेत. एक कर्मचारी २ रोपटे असी समीकरण तयार करून त्याला कॉमन वॉट्सअॅप क्रमांकावर वृक्षारोपण केल्याचे छायाचित्र टाकण्याचे बंधनकारक केले आहे. पूर्व नागपुरात वृक्षारोपणाची जबाबदारी स्वीकारण्याची हमीही बँकेचे चंद्रमौली भारद्वाज,महेश वारके यांनी दिली.
ग्रीन व्हिजिलची ग्रीन हाक गड्डीगोदाम परीसरात ३०० वर्षे जुन्या एका झाडाची फांदी तोडायचे कारण सांगून झाड तोडायला निघालेल्या प्रवृतीला रोखणारी ग्रीन व्हिजिल संघटनेचे कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल आपल्या सहकाऱ्यांसह पांढराबोडी तलावाच्या शेजारी व अंबाझरी परिसरात होणाऱ्या वृक्षारोपणात हातभार लावणार आहे. पालकत्वही स्वीकारणार आहे.
शाळेत 'कामयाब'
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने झाड लावून त्याचा सेल्फी काढावा आणि पुढे प्रत्येक महिन्यात त्याचा सेल्फी काढून त्याची वाढ निदर्शनास आणून द्यायची, अशी मोहीम कामयाब फाउंडेशनचे हितेश डोर्लीकर राबविणार आहेत. त्यासाठी ५० शाळांचा ग्रुप तयार केला जावा, अशी सूचना केली.
सीएंची झाडात गुंतवणूक सीए संघटनेचे स्वप्नील घाटे व सुरेश दुरूगकर यांनी ३० जून रोजी होणाऱ्या संघटनेच्या कार्यक्रमात प्रत्येक सदस्यांना एक रोपटे देऊन ते जगविण्याची हमी घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे ५०० ते ६०० सदस्य वृक्षारोपण करतील. शिवाय, संघटनेची ओळख असलेल्या उद्योगजगताकडून ट्री गार्डची व्यवस्था करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. संघटनेशी संबंधित ७ ते ८ हजार विद्यार्थ्यांचीही या अभियानात मदत घेण्याची हमी देण्यात आली.
वर्धमाननगरात ट्रीगार्डसह झाडे लायन्स क्लबतर्फे अजय अडीयाचा यांनी वर्धमाननगरात ट्री गार्डसह १०० रोपटे १ जुलैला लावण्यात येणार असल्याची माहिती दिली. शिवाय, वृक्षारोपणासाठी मनपाला ट्री गार्ड देण्याचेही मान्य केले. 'पर्यावरण समृद्ध शहर' अशी ओळख निर्माण होण्यासाठी वृक्षारोपण अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी अधिकाधिक वृक्षलागवड करण्याचे आवाहन 'मटा'तर्फे करण्यात आले आहे. नागपूर देशातील कितव्या क्रमांकाचे हिरवेगार शहर आहे, याची अधिकृत माहितीही जनतेपर्यंत जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी अधिकृत संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरज आहे. शिवाय, शहरातील एक मार्ग 'ग्रीन स्ट्रीट' म्हणून विकसित केला जावा. स्मृतिप्रीत्यर्थही झाडे लावली जावीत. झाडे लावण्याची चळवळ निर्माण व्हावी. वृक्षारोपणासाठी धडपडणाऱ्यांचा यथोचित गौरव व्हावा. यासाठी वृक्षारोपणासाठी झटणारे भीमराव म्हैसकर यांना अभियानासाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवावे, अशी सूचना 'मटा'चे वरिष्ठ संपादक श्रीपाद अपराजित यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट