राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या नियुक्तीला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात विद्यापीठाच्या परीक्षा यंत्रणेच्या सुधारणांना फास्ट ट्रॅकवर आणण्यात डॉ. येवले यांना यश आले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत चपखल वापर करीत विद्यार्थी नोंदणी ते निकाल या एन्ड टू एन्ड सिस्टीमला लागू करण्यासाठी त्यांनी जोरकस प्रयत्न केले. प्रसंगी काही कठीण निर्णय घ्यावे लागले, तर काही संकटांचाही सामना करावा लागला. परंतु, वर्षभरात विद्यापीठाने सुधारणांच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले, हे नमूद करावे लागेल.
विद्यापीठाच्या सिनेट ते व्यवस्थापन परिषद अशा विविध प्राधिकारणींवर काम करण्याचा डॉ. येवले यांना अनुभव आहे. त्यामुळेच त्या प्राधिकारणीवर सदस्य म्हणून बोलताना परीक्षा यंत्रणेतील उणिवांवर ते बोट ठेवत होते. तर आता प्र-कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळताना त्या उणीवा दूर करण्यासाठी त्यांनी काम केले. सदस्य म्हणून टीका करणे सोपे आहे, परंतु संधी मिळाल्यावर त्याच टीकांना सकारात्मक पद्धतीने दूर करून यंत्रणा सशक्त करणारे फार मोजके असतात. विद्यापीठातील राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असताना पद मिळाल्यावर त्याच मुद्यांना बगल देण्याची वृत्ती यापूर्वी विद्यापीठाने अनुभवली आहे. परंतु, डॉ. येवले यांनी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सुविधा केंद्र, उत्तरपत्रिकांची निर्दोष तपासणी, जलद गतीने निकाल, फेरमुल्यांकनात गतिमानता, परीक्षा केंद्रांतील सुधारणा यावर उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्यांना प्र कुलगुरू म्हणून संधी मिळाल्यावर सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळेच विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा संपण्यापूर्वीच तब्बल ४५० हून अधिक निकाल जाहिर केले आहेत. त्याकरिता आवश्यक असणारी सक्षम यंत्रणा डॉ. येवले यांच्या पुढाकारामुळे विद्यापीठाला विकसित करता आलेली आहे.
पारदर्शकता महत्त्वाची ः डॉ. येवले
परीक्षा यंत्रणा विद्यापीठाचे नाक आहे. त्यामुळे त्यात उणीवा असूच नये या मताचा आहे. वर्षभरापुर्वी विद्यापीठातील हीच यंत्रणा ढासळली होती. त्यामुळे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी प्र-कुलगुरू पदाची जबाबदारी सोपविली तेव्हा ढासळलेली यंत्रणा नव्याने उभारण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयात कुलगुरू व विद्यापीठातील प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली आहे. विद्यापीठाच्या यंत्रणेवरून विद्यार्थ्यांचा विश्वास उडत होता, त्यामुळे त्यांचा विश्वास संपादित करण्याचेही आव्हान होते. त्यामुळेच निकाल गतिमान लागणे हेच ध्येय समोर ठेवण्यात आले. त्याकरिता आवश्यक असणारी ऑनलाइन यंत्रणा विकसित केली. आज त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. विद्यापीठाला आगामी काळात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. तसेच आव्हानेही आहेत. त्यावर मात करण्यासाठीच कॉलेज व विद्यापीठ पातळीवर ४०-६० परीक्षेचा फार्मूला देण्यात आला होता. ही पद्धत लागू न झाल्याचे शल्य आहे.
सुधारणा अशा
हिवाळी परीक्षेत इंजिनीअरिंग, फार्मसी व लाचे ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी, उन्हाळी परीक्षेत विज्ञान, शिक्षण आणि गृहविज्ञानाचा ऑनलाइन तपासणीत समावेश, १२० स्कॅनर्स असणारे केंद्र, दिवसाला २५ ते २७ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, परीक्षा भवनात २७२ संगणक असणारे देशातील सर्वात मोठ्या ऑनस्क्रीन तपासणीचे केंद्र, इंजिनीअरिंग प्रश्नपत्रिकांची परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन डिलिव्हरी सुरू, केंद्रीय पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करणे सुरू, युजीसीच्या नियमानुसारच पीएचडी नोंदणी, पीएचडी अधिनियमात सुधारणा, कालमर्यादा निश्चित केल्या, पीएचडी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन, पीएच.डी कोर्स वर्कही केंद्रिय पद्धतीने, उत्तरपत्रिका तपासणीला गती, रिसर्च सेंटरवर संशोधक विद्यार्थ्यांच्या संख्येला मर्यादा, पीएच.डी पात्रता परीक्षेत सुधारणा, परीक्षा रेकॉर्डचे डिजिटलायझेशन.
वर्षभरातील उणिवा
एमकेसीएलला हाताळण्यात हयगय, अनेक गोंधळ
हिवाळी परीक्षांच्या निकालांना विलंब झाल्याने संभ्रम
ऑनस्क्रीन तपासणीला सुरवातीला संथ प्रतिसाद
तंत्रज्ञानाचा अतिवापरावर आक्षेप
निकालांमध्ये तांत्रिक कारणांमुळे चुका
हॉलतिकीट व वेळापत्रकात गोंधळाने संभ्रम
विविध कंपन्यांचे एकसुरी काम नाही
प्रयोगांपेक्षा समस्यांवर खंबीर उपायांची अपेक्षा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट