Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

नाग नदी स्वच्छ झाली, वाहू लागली

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

नागपूरच्या ऐतिहासिक नाग नदीचे रूप बदलले आहे. गेला दीड महिना नदीची स्वच्छता करण्यात आली. पात्रातील कचरा काढल्याने प्रवाह वाहता आहे. अंबाझरी ते पुढे पावनगावापर्यंत नदीने मोकळा श्वास घेतला आहे. नाग नदीसोबतच पिवळी व पोहरा नदीची स्वच्छता झाल्यामुळे पावसाळ्यात नागपूरकरांची होणारी पळापळ यंदा थांबणार आहे. अनेक संस्थांची सढळपणे मदत, स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार आणि लोकसहभागाने हे सर्व शक्य झाले आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून नाग नदी पुनरुज्जीवनाच्या कामास सुरुवात होईल, अशी माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली.

महापौरांनी शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत नाग, पिवळी व पोहरा नदीच्या स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या कामाही पाहणी केली. हे अभियान थांबले, मात्र संपलेले नाही, असे स्पष्ट करीत पुढीलवर्षी जानेवारीपासून सलग सहा महिने नद्यांची स्वच्छता करून आगामी काळात शहरातील जलसाठे स्वच्छ व संरक्षित करण्यात येतील, असा दावा त्यांनी केला. 'मटा'ने पुढाकार घेत या मोहिमेला बळ दिले होते. २०१३ मध्ये सुमारे महिनाभर घरोघरी जाऊन जनजागृती अभियान राबविले होते. त्यानंतर मनपाने नाग नदी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ केला होता. यंदाचे स्वच्छतेचे हे तिसरे वर्ष आहे. स्वच्छतेनंतर दरवर्षी नदी पुन्हा अस्वच्छ होते. यामुळे नागपूरकरांनाच त्रास व अडचण होत असल्याचे सांगत, नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागपूरकराने पाळावी, असे आवाहन महापौरांनी केले. दौऱ्यात स्थायी समिती सभापती बंडू राऊत, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, संबंधित स्ट्रेचचे सर्व कार्यकारी अभियंता, सहायक झोन आयुक्त, उपअभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.

मोठा गाळ उपसला

अक्षयतृतीयेला, ९ मे रोजी हे अभियान सुरू करण्यात आले. ५ जून रोजी अभियानाचा शेवट होता. मात्र, त्याला आणखी काही कालावधी देण्यात आला. अशाप्रकारे सुमारे दीड महिना हे अभियान चालले. या काळात सुमारे १ लाख ७१ हजार ६०६ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. शहराबाहेर यातील सुमारे सात हजार मेट्रिक टन गाळ देण्यात आला.

पिवळी, पोहरालाही नवसंजीवनी

पिवळी नदी नारा घाट, कळमनामार्गे पावनगावपर्यंत मुक्तपणे वाहत आहे. सर्वाधिक​ अतिक्रमण याच नदीच्या पात्रातून काढण्यात आले. दक्षिण दिशेने वाहणाऱ्या पोहरा नदीलाही पुन्हा जिवंतपणा आला आहे. आपली ओळख हरवून बसलेल्या या नदीचे पात्र रुंद करण्यात आले. काही ठिकाणी पूल रुंद करण्यात आला. हुडकेश्वरजवळ असलेल्या नदीकाठचे अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले. पोहरा नदीवर आदर्श संस्कार विद्यालयाने बांधलेला अवैध पूल तोडला जाणार आहे. दरवर्षी या पुलावर पावसाळ्यात विद्यार्थी अडकून पडतात. मनपा आता स्वत: हा पूल तोडणार आहे. त्यावर नवा उंच पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे.

मातीचे ढिगारे काठावरच

मनपाने स्वच्छता अभियान राबविले असले तरी, अनेक ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यांचे मनोरे उभेच आहेत. कळमनाजवळ मोठाले ढिगारे दिसतात. ते उचलणे आवश्यक आहे. जगनाडे चौकापुढे वाहणाऱ्या नदीच्या पात्रातील ढिगारे काढण्यासाठी दाट वस्ती व घरे अडचण आहे. सेंट ​झेव्हिअरच्या अगदी शेजारी नाग नदीतील बहुतेक गाळ पसरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>