'येत नाही,येत नाही' म्हणत सोमवारी पावसाने नागपूरकरांचा खास तास घेतला. सुमारे तासभर जबर झोडपून काढले. यात संपूर्ण शहर चिंब झाले. कार्यालयाचे काम आटोपून परतणाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. वादळ, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी धावाधाव झाली. चार ठिकाणी झाडे पडली तर, चौकांमध्ये पाणी साचले. शहरातील अनेक खोलगट भागात तलाव तयार झालेत. उतार भागातून तर नदीच वाहत होती. यावरून शहरात पावसाळ्यातील संकटमुक्तीसाठी आणखी वेगळे प्रयोग करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले.
पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. धो धो बरसला. वादळ आणि वाराही सोबतीला होता. त्यामुळे वातावरण अचानक बदलले. सायंकाळी काम संपवून घरी जाणाऱ्यांची यामुळे तारांबळ उडाली. अनेकजण पावसामुळे अडकून पडले. रेनकोटही पावसाला अंगावर झेलू शकत नव्हता, एवढा पावसाला संताप आला होता. या संतापाच्या भरात अवघ्या शहराला पावसाने धुवून काढले. असेल नसेल ती सर्व स्वच्छता करीत, सोबत वाहून नेले. झाडेही पाडली. त्यामुळे काही ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले. त्रिमूर्तीनगरातील भगवती लॉनजवळ एक मोठे झाड पडले. वर्दळीच्या व मद्यपींचा अड्डा असलेल्या सराफ चेंबर्सजवळील हॉटेलाजवळील मार्गावर प्रकाश नर्सिंग होमजवळही एक झाड पडले. माजी नगरसेवक दिवंगत बिन्नू पांडे यांच्या घराजवळही एक मोठे झाड पडले. या सर्व ठिकाणी अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेतली. वंजारीनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील हनुमान मंदिर, बीसीएन कार्यालयाजवळही उभ्या असलेल्या वाहनांवर एक मोठे झाड पडले. पाऊस असल्याने अनेकजण आडोशाने झाल्याने झाड पडल्यानंतरही कुठलीच अनुचित घटना घडली नाही.
इतवारी, कळमना रोडकडील प्रेमनगर,कावरापेठ, कोराडी मार्गावरील गोधनी, फ्रेंड्स कॉलनी, जाफरनगर, जरिपटका भागातील नारा, कस्तुरबा नगर, मार्टीननगर, नारीकडील दीक्षितनगर, राणीदुर्गावतीनगर चौक, विनोबाभावेनगर, पूर्व नागपुरातील वाठोडा,पारडी, भरतवाडा, दिघोरीकडील रामकृष्णनगर, जयताळा मार्ग, गिट्टीखदान, सेमीनगरी हिल्स, गोरेवाडा, बोरगाव, मध्य नागपुरातील हंसापुरी, डोबीनगर, मोमीनपुरा यासह अनेक भागात पाण्याने घुसखोरी केली. यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट