mandar.moroney @timesgroup.com
इच्छामरणाबाबत आपल्या देशात अजूनही सामाजिक आणि कायदेशीर एकमत होत नसले तरी आता रुग्णांना सन्मानपूर्वक मरण स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असावे, या मागणीसाठी देशभरातील डॉक्टर्स आणि कायदेतज्ज्ञ एकत्र येऊ लागले आहेत. डॉक्टर्स आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी या 'मृत्यूच्या स्वातंत्र्यांचा' सन्मान करावा, असा विचार दृढ करण्यासाठी हे सगळे तज्ज्ञ येत्या रविवारी दिल्लीत मंथन करणार आहेत.
विविध आजारांनी खितपत पडलेले रुग्ण सर्वत्र मोठ्या संख्येने आढळत असतात. यामध्ये, मेंदूशी संबंधित असलेले विविध आजार, स्मृतिभ्रंश किंवा अगदी कर्करोगामुळे आजारी असलेलेही रुग्ण असतात. अशा रुग्णांना मरण येत नसले तरी जगणेही अत्यंत कठीण झाले असते. अशा व्यक्तींना मरण येऊ देण्याची ना नातेवाइकांची तयारी असते ना डॉक्टर्स. मात्र, ज्या ज्या वेळी रुग्ण अशी इच्छा व्यक्त करतील तेव्हा त्यांच्या इच्छेला मान देऊन त्यांना जगाचा निरोप घेऊ दिला जावा, ही संकल्पना घेऊन ही परिषद दिल्ली येथे होणार आहे.
--दुसऱ्या महायुद्धाचा हा परिणाम
दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात मानवी जन्मदर वाढला. १९४७ च्या दरम्यान हा प्रकार घडला आणि या काळात जन्मलेल्या बालकांना 'बेबी बूमर्स' ही सगळी पिढी सध्या ८० ते ९० वयोगटात आहे. त्यानंतर, कधीही इतका मोठे युद्ध न झाल्याने आणि वैद्यकीय सुविधांमध्ये प्रगती झाल्याने आयुर्मान वाढत गेले. वयोवृद्ध झालेल्या या व्यक्तींना सन्मानपूर्वक मृत्यू येऊ द्यावा, ही मागणी पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जोर धरत आहे. भारतातही या पिढीतील लोकांसाठी स्वेच्छामरणाच्या या 'पॅसिव्ह' पर्यायाची चर्चा सुरू झाली आहे.
--हे सन्मानाने मरण...
इच्छामरणामध्ये कृत्रिम पद्धतीने रुग्णाचे मृत्यू घडवला जातो. 'सन्मानाने मरण' ही संकल्पना यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. रुग्णांचा मृत्यू कृत्रिम पद्धतीने न घडवता नैसर्गिकरीत्या मरण येऊ दिले जाते. जीव वाचविणाऱ्या उपचार पद्धती पूर्णपणे थांबविल्या जातात. केवळ रुग्णाला संसर्ग होणार नाहीत, त्याचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. असे घडवून आणण्यासाठी डॉक्टर्स आणि नातेवाईक यांनी दोन पावले मागे येण्याची तयारी दाखवावी, असा विचार 'सन्मानपूर्वक मरण' या संकल्पनेचे समर्थक मांडत आहेत.
--अनेकांची इच्छा...
असे सन्मानपूर्वक मरण हवे असणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. अनेक वृद्ध आपल्या जवळच्या नातेवाइकांकडे किंवा विश्वासातील डॉक्टर्सकडे याबाबत इच्छा व्यक्त करीत असतात. ऐंशी आणि नव्वद वर्षांचे आयुष्य जगल्यावर आता आणखी किती जगायचे, असा सवाल हे लोक करतात. आता सन्मानाने आयुष्य संपवू द्या, असे म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतात गेले सहा महिने या विषयावर चर्चा सुरू आहे. हा पर्याय स्वीकारल्यास अनेक खितपत पडलेल्या रुग्णांची त्रासातून सुटका होणार आहे. या विषयाचे विविध पैलू तपासून बघण्यासाठी देशभरातील डॉक्टर्स आणि वकील एकत्र येऊन चर्चा करतील, अशी माहिती नागपुरातील न्युरॉलॉजिस्ट डॉ. पूर्णिमा करंदीकर यांनी दिली. डॉ. करंदीकर यादेखील या परिषदेत सहभागी होणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट